एसटी महामंडळाकडून वृद्धेचा अवमान, आधारकार्डची प्रत दाखवूनही आकारले पूर्ण तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:35 AM2018-03-03T03:35:11+5:302018-03-03T03:35:11+5:30
नालासोपारा ते ठाणे दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या ६५ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तसेच आधार कार्डची प्रत दाखवूनही त्यांच्याकडून महिला वाहकाने पूर्ण तिकिट आकारले.
ठाणे : नालासोपारा ते ठाणे दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या ६५ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तसेच आधार कार्डची प्रत दाखवूनही त्यांच्याकडून महिला वाहकाने पूर्ण तिकिट आकारले. वारंवार विनंती करूनही तिकीटाचे पूर्ण पैसे द्या, अन्यथा खाली उतरा अशा भाषेत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने एसटी महामंडळाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे.
ठाण्यात वास्तव्याला असलेल्या नलिनी मधुकर रेडकर या २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नालासोपारा येथे काही कामानिमित्त गेल्या होत्या. नालासोपारा येथून ठाण्याकडे येणाºया राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये दुपारी त्या बसल्या. ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत असल्याने तिकिटाची अर्धी रक्कम देऊन त्यांच्याकडील ज्येष्ठ नागरिकाचे कार्डही संबंधित वाहकाला त्यांनी दाखविले. यावर ए. डी. खरात या महिला वाहकाने ज्येष्ठ नागरीक कार्डासोबतच वयाच्या पुराव्याची त्यांच्याकडे विचारणा केली. सोबत आधारकार्डची प्रतही त्यांनी दाखविली. त्यावर आधारकार्डची रंगीत झेरॉक्स प्रत असल्यामुळे ती चालणार नसल्याचा दावा करून खरात यांनी तिकिटाची पूर्ण रक्कम त्यांच्याकडे मागितली. नालासोपाºयाकडे येतांना हेच कार्ड दाखविल्यानंतर आधीच्या वाहकाने निम्मेच तिकीट घेतल्याचाही दावा रेडकर यांनी केला. ते तिकिटही त्यांनी दाखविले. हा आपला नेहमीचा प्रवास असून या प्रवासात ही सवलत मिळत असल्याचे वारंवार त्यांनी सांगूनही तिकिटाचे पूर्ण पैसे भरा, अन्यथा खाली उतरा असा, दम त्यांनी दिल्याने रेडकर यांनी पूर्ण तिकिट काढून तो प्रवास केला. मात्र, अर्ध्या तिकिटाची सवलत ज्येष्ठ नागरिकांना असतांनाही अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्या व्यथित झाल्या.
ज्येष्ठ नागरिक कार्ड हे ज्येष्ठांनाच मिळते. सोबत आधार कार्डची रंगीत झेरॉक्स प्रत, ठाणे ते नालासोपारा या प्रवासाचे अर्ध्या दराचे तिकिट दाखवूनही पूर्ण तिकिट काढण्याची सक्ती एसटीच्या वाहकाने का केली? अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणाºया संबंधित वाहकावर कारवाईची मागणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड प्रमाण मानण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
>नलिनी रेडकर यांनी राष्टÑवादी ठाणे शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या मार्फतीने ही तक्रार आमच्याकडे केली आहे. प्रवासी महिलेचे ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तपासले. नियमाने तिचे निम्मे तिकिट घेऊन त्यांना सवलत देणे अपेक्षित होते. त्यांनी तसे केले नाही. संबंधित बस आणि वाहक हे नालासोपारा (पालघर जिल्हा) आगाराचे आहेत. त्यामुळे या वाहक महिलेवर कारवाई करण्याचे पत्र पालघर विभागाला देण्यात आले आहे.
- अविनाश पाटील, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन सेवा, ठाणे