फुल मार्केट लवकरच नवीन इमारतीत
By admin | Published: May 2, 2017 02:11 AM2017-05-02T02:11:49+5:302017-05-02T02:11:49+5:30
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेले फुल मार्केट फुलविक्रेत्यांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे
मुरलीधर भवार / कल्याण
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेले फुल मार्केट फुलविक्रेत्यांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन समितीने नवीन वास्तू उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मिळावी, असा प्रस्ताव केडीएमसीला सादर केला होता. त्यास केडीएमसीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवीन फुल मार्केट बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण बाजार समितीच्या आवारात १५ वर्षांपासून सुरू असलेल्या फुल मार्केटमध्ये पावसाळ्यात पाणी साचत होते. त्यामुळे फुलविक्रेत्यांचा माल भिजून त्याचे नुकसान होते. पत्र्याची शेड अत्यंत जुनी झाली आहे. तेथे पिण्याचे पाणी तसेच प्रसाधनगृहाची सोय नाही. त्यामुळे येथे येणारे विक्रेते व ग्राहकांचे अतोनात हाल होतात. या फुल मार्केटमध्ये कल्याण तालुक्याबरोबरच नगर, पुणे येथील शेतकरी माल घेऊन येतात. वर्षाला या बाजारात ५५ कोटी रुपयांची उलाढाल होते. दादर फुल मार्केटनंतर कल्याण ही ठाणे जिल्ह्यातील मोठी फुल बाजारपेठ आहे. पंचक्रोशीतील हारफुलविक्रेते या बाजारातून माल नेतात. त्यामुळे फुल बाजारासाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा प्रस्ताव बाजार समितीने तयार केला.
फुल मार्केटमध्ये महापालिकेच्या जागेत २१०, तर बाजार समितीच्या जागेत १९६ फुलविक्रेते व्यवसाय करतात. या दोन्ही फुलविक्रेत्यांसाठी तळ अधिक एक मजल्याची भव्य फुलमार्केटची वास्तू उभारली जाणार आहे. ख्यातनाम वास्तुविशारद शशी प्रभू यांच्याकडून त्याचा आराखडा तयार करून घेण्यात आला आहे. हे मार्केट उभारण्यासाठी किमान १६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. फुलविक्रेत्यांकडून त्याचे पैसे घेऊन त्यांना अद्ययावत सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. या इमारतीत ११६ भाजीपालाविक्रेत्यांनाही सामावून घेतले जाईल. जे व्यापारी पैसे देतील, त्यांना या नव्या इमारतीत गाळे दिले जाणार आहे. नव्या वास्तूच्या बांधकाम परवानगीचा प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना खात्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर केला जात नसल्याने त्याची गंभीर दखल भाजपा आमदार किसन कथोरे यांनी घेतली. कथोरे यांनी बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांच्यासह आयुक्त ई. रवींद्रन यांची मागील महिन्यात भेट घेतली. त्यावेळी फुल मार्केटच्या बांधकामास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर, आयुक्तांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत फुल मार्केटच्या नव्या वास्तूच्या बांधकामास महापालिकेने परवानगी दिली आहे. बाजार समितीने नुकतीच एक बैठक घेऊन पुढील कार्यवाहीस मंजुरी दिली आहे. महिनाभरात बांधकामासाठी निविदा मागवली जाईल. नव्या फुल मार्केटच्या वास्तूतील पहिल्या मजल्यावर फुलांसाठी शीतगृह असेल. त्यामुळे फुले खराब होणार नाहीत, असे घोडविंदे यांनी सांगितले.
पाठपुराव्याचे श्रेय ‘लोकमत’ला
फुल मार्केटच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने आॅगस्ट २०१६ मध्ये प्रकाश टाकला होता. त्यानंतर, फुल मार्केटच्या बांधकामास पालिकेकडून परवानगी दिली नसल्याचे वृत्तही नुकतेच प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे फुलविक्रेत्यांना नवे फुल मार्केट उपलब्ध होणार आहे, अशी बाब खुद्द घोडविंदे यांनी कबूल केली आहे. हे श्रेय ‘लोकमत’चे आहे, असे ते म्हणाले.