इंदिरा गांधी चौकात पूर्णवेळ पोलीस
By admin | Published: February 21, 2017 05:24 AM2017-02-21T05:24:49+5:302017-02-21T05:24:49+5:30
क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याने एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना पूर्वेतील इंदिरा गांधी
डोंबिवली : क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याने एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात मागील आठवड्यात घडली. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वाहतूक नियंत्रण विभागाने तेथे पूर्णवेळ एक वाहतूक पोलीस आणि एक वॉर्डन नेमला आहे.
इंदिरा गांधी चौकात अनेक रिक्षा स्टॅण्ड आहेत. त्यापैकी एसटीच्या पनवेल थांब्याचा भाग रिक्षाचालक बळकावतात. मागील आठवड्यात तेथील एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण केली होती. तक्रारदार नसल्याने दोषी रिक्षाचालकाला पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. मात्र, ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक मुरलीधर नाईकनवरे यांनी रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली आहे.
पनवेल थांब्याच्या वळणावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणारे रिक्षाचालक तसेच वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जे वाहनचालक समज देऊन ऐकतात त्यांना प्रबोधन, तर जे वारंवार नियम मोडतात, त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे नाईकनवरे म्हणाले.
दरम्यान, या कारवाईसाठी वॉर्डन निलेश झेमसे, राजेश शहाणे व अन्य सहकाऱ्यांची मोलाची मदत होत आहे, असे नाईकनवरे म्हणाले. (प्रतिनिधी)