उल्हासनगर गोळीबाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल; आमदार गायकवाड यांच्या संतापाने पोलीस हादरले
By सदानंद नाईक | Published: February 6, 2024 08:11 PM2024-02-06T20:11:14+5:302024-02-06T20:11:33+5:30
गोळीबार घटनेचा ११ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
उल्हासनगर: हिललाईन पोलीस ठाण्यातील आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आमदारांचा संताप बघून पोलिसही हादरले आहे. वरिष्ठ पोलिसांनी त्यांच्या हातातील रिव्हॉल्वर हिसकावून घेतली नसतील मोठा अनर्थ घडला असता. असे पोलिसांचे म्हणणे आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर द्वारली येथील वादग्रस्त जमिनीवर प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर रात्री साडे नऊ वाजता जमीनमालक जाधव कुटुंबाच्या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. याबाबतच्या चौकशीसाठी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, त्यानंतर शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील व जमीनमालक चैनू जाधव आले होते. पावणे ११ वाजता आमदार गणपत गायकवाड केबिन मध्ये आल्यावर वैभव गायकवाड केबिन बाहेर गेले. त्यानंतर केबिन बाहेर समर्थकात शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुकीं व शस्त्र काढण्याचे प्रकार झाले. त्यांना शांत करण्यासाठी पोलीस अधिकारी जगताप केबिन बाहेर गेल्यानंतर, आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.
यापूर्ण गोळीबार घटनेचा ११ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस ठाणे अंतर्गतील गोळीबाराचे व्हिडीओ कोण व्हायरल Hकरत आहे? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. व्हिडीओ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील, चैनू जाधव बसलेले दिसतात. आमदार गणपत गायकवाड हे केबिन मध्ये आल्यानंतर वैभव गायकवाड बाहेर जातात. मात्र सर्वांचे लक्ष केबिन बाहेरील समर्थकात चाललेल्या धिंगाण्याच्या सीसीटीव्हीवर असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिन बाहेर समर्थकांना बाहेर जाताच, आमदार गणपत गायकवाड यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.
पोलिसांची दमछाक
आमदार गायकवाड यांच्या गोळीबाराचा आवाज ऐकताच पोलीस अधिकारी जगताप यांच्यासह अन्य कर्मचारी केबिन मध्ये आले असता, शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून आमदार गणपत गायकवाड मारहाण करतात. त्यांना शांत करतांना पोलिसांची चांगलीच दमछाक उडाल्याचे दिसते. आमदारांच्या हातांतील रिव्हॉल्वर पकडून ठेवली नसतीतर, त्यामध्ये शिल्लक दोन गोळ्या फायर झाल्या असत्या.