श्वान निर्बीजीकरण एक वर्षापासून बंद असतानाही ठेकेदाराला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:47 PM2019-12-19T23:47:02+5:302019-12-19T23:47:09+5:30

शिवसेनेचा आरोप : पालिका प्रशासनाकडून स्पष्ट नकार

Funding to the contractor even if the dog sterilization is closed for one year | श्वान निर्बीजीकरण एक वर्षापासून बंद असतानाही ठेकेदाराला निधी

श्वान निर्बीजीकरण एक वर्षापासून बंद असतानाही ठेकेदाराला निधी

Next

ठाणे : मागील वर्षभरापासून निधीच नसल्याने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण रखडले असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर, आॅगस्ट २०१९ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र, त्या प्रस्तावावरून वादंग निर्माण झाल्याने ही प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे हा ठेका आजही बंद असला, तरी संबंधित ठेकेदाराला पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला.
महापालिका हद्दीत २००४ पासून ते आतापर्यंत ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. या निर्बीजीकरणासाठी तब्बल आठ कोटींचा निधी खर्च झाला असताना यावर पुन्हा नव्याने दीड कोटी रु पयांचा निधी खर्च करण्यात येणार होता. त्यासंदर्भातील प्रस्ताव आॅगस्ट महिन्याच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर आला असता लोकप्रतिनिधींवर त्यास आक्षेप घेऊन तो मंजूर केला नव्हता. दरम्यान, गुरुवारी झालेल्या महासभेत भोईर यांनी यासंदर्भात प्रश्न पुन्हा केला असता निर्बीजीकरणाचा ठेका बंद असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. परंतु, ठेका रद्द झाला असतानाही ठेकेदाराला निधी दिला जात असल्याचा आरोप भोईर यांनी केला. मात्र, तसा काही प्रकार घडत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेतील कर्मचाऱ्यांना घेऊन ही निर्बीजीकरणाची प्रक्रिया करावी, अशी मागणीही यावेळी केली.
निविदा प्रक्रिया करणार नव्याने
ठाणे महापालिकेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने २००४ पासून भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे महापालिका हद्दीमधील जवळपास ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. यापूर्वी २६ डिसेंबर २०१६ रोजी स्थायी समितीमध्ये निर्बीजीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी तीन वर्षांकरिता निविदा मागवण्यात आली होती. मात्र, आॅगस्ट २०१८ मध्ये या कामाची मुदत संपल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे या मोहिमेला निधी मिळू शकला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळेच आजतागायत हा ठेका वाढविण्यात आलेला नाही. भटक्या कुत्र्यांची समस्या ठाण्यात मोठी आहे. त्यामुळे आता यासाठी नव्याने निविदा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Web Title: Funding to the contractor even if the dog sterilization is closed for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.