स्मारकाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 01:33 AM2020-11-18T01:33:11+5:302020-11-18T01:33:20+5:30
एकनाथ शिंदे यांची ग्वाही : बदलापूरमध्ये झाले बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूरमध्ये साकारण्यात येणाऱ्या सुसज्ज स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. सरकार आपले आहे, त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. हे स्मारक नागरिकांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा भूमिपूजन सोहळा पार पडला. बदलापूर येथे पालिकेच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम करण्यात येणार आहे. हे स्मारक राज्यातील पहिले स्मारक म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे स्मारकाचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार व्हावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही. बाळासाहेब हे नावच तमाम नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण करणारे आहे. या स्मारकात परिपूर्णता असेल. या स्मारकातून व्यंगचित्रकार, कलाकार, कलासक्त रसिक आणि कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे, कलाकारांची कदर करणाऱ्या बाळासाहेब यांचे विचार येणाऱ्या रसिकांना मिळतील.
या स्मारकास ठाणे जिल्ह्यातूनच नव्हेतर, संपूर्ण राज्यातून बाळासाहेबांवर भरभरून प्रेम करणारे रसिक अवश्य भेट देतील, असा विश्वासही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. त्यामुळे त्यांचे स्मारकही त्यांच्या नावाला साजेसे व्हावे ही इच्छा आहे. त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम वामन म्हात्रे यांनी करावे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून ते नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्मारकाचा आराखडा पाहता हे स्मारक राज्यातील चांगल्या स्मारकांमध्ये गणले जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या भूमिपूजन सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख वामन म्हात्रे, नगरसेवक तुकाराम म्हात्रे, प्रवीण राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी शपथ घेताच आराखडा मंजूर
बाळासाहेबांच्या नावाने भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला होता. त्याचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र युतीचे सरकार असतानाही दबावामुळे या आराखड्याला मंजुरी मिळत नव्हती. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच आठव्या दिवशी ए.डी.टी.पी. कार्यालयाने या आराखड्याला मंजुरी दिली. ठाकरे सरकारमुळे या स्मारकाचे काम पुढे सरकत असल्याचा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला.