ठाकरे नाट्यगृहासाठी निधी मंजूर; नगरविकासमंत्र्यांचे प्रधान सचिवांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:00 AM2020-01-18T01:00:25+5:302020-01-18T07:13:19+5:30
नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
भिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्यरसिकांच्या करमणुकीसाठी असलेले एकमेव मीनाताई ठाकरे रंगायतन सध्या नादुरु स्त असल्याने बंद आहे. दोन वर्षांपासून हे नाट्यगृह बंद असल्याने येथील रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची कैफियत ‘लोकमत’च्या १३ जानेवारीच्या अंकात मांडण्यात आली होती. या वृत्ताची दखल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी १० कोटी देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना निधी देण्याचे आदेश दिले. २५ वर्षापूर्वी नाट्यगृह बांधण्यात आले. मात्र या नाट्यगृहाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते बंद पडले. नाट्यगृहाअभावी येथील कलावंत व रसिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, नाट्यगृहाच्या देखभालीवर मोठा खर्च होणार असून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याशी चर्चा करून या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतल्यानंतर हा निधी मंजूर केला.