गंगुबाई शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:38 AM2019-04-19T05:38:13+5:302019-04-19T05:38:21+5:30

शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले.

Funeral on Gangubai Shinde | गंगुबाई शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार

गंगुबाई शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

ठाणे : शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगुबार्इंच्या निधनप्रसंगी शिंदे हे निवडणुकीच्या प्रचारासाठी पालघरला होते. परंतु, हे वृत्त समजताच त्यांनी ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्रीच रु ग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. गुरुवारी सकाळी ठाण्याच्या लुईसवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, भाजपचे आमदार संजय केळकर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंत्यदर्शन घेतले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून यावेळी हजारो शिवसैनिक यावेळी हजर होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास किसननगर येथील जुन्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात आले. त्यानंतर, वागळे इस्टेट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
>राष्ट्रवादीच्या सभा स्थगित
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी त्यांचा ठाणे विधानसभा,ओवळा माजिवडा विधानसभा व कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारदौरा आणि चौकसभा रद्द केल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दु:खात परांजपे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title: Funeral on Gangubai Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.