मुस्लिम तरु णांनी केले हिंदू शेजा-यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:30 AM2018-01-05T06:30:37+5:302018-01-05T06:31:24+5:30
धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर राग खदखदत असल्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या काही घटनांवरून पुन्हा एकदा दिसून आले.
- कुमार बडदे
मुंब्रा : धर्म आणि जातपात विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूबांधवाच्या अंतिम संस्काराचे सोपस्कार पूर्ण करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवले. एकीकडे स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काही भागांत आजही जात विसरली जात नसून एकमेकांच्या जातीवरून अनेकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर राग खदखदत असल्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या काही घटनांवरून पुन्हा एकदा दिसून आले. ज्या दिवशी राज्यामध्ये जातीपातीवरून संघर्ष टिपेला पोहोचला होता, त्याच दिवशी स्वत:चे वाढदिवस विसरून मुंब्य्रातील काही मुस्लिम तरु णांनी एका हिंदूच्या अंतिम विधीत सहभागी होऊन धार्मिक सोपस्कार पूर्ण करून अनोख्या एकात्मतेचा संदेश दिला.
मूळचे बिहार राज्यातील परंतु मागील काही वर्षांपासून मुंब्य्रातील शिवाजीनगर भागातील गमई चाळीत राहणारे राम बिहारीलाल मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. नगरसेवक अशरफ पठाण यांनी हे कळताच त्यांच्या सहकारी मित्रांना लाल यांच्या घरी पाठवले. तेथे गेल्यावर महेशर शेख, शाकीब दाते, जैनुउद्दीन शेख आणि सलीम या तरु णांनी परिस्थितीचा अंदाज घेतला असता लाल यांच्या घरात त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि चार लहान मुले असल्याचे तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर, त्या तरु णांनी आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही जणांनी ठाण्याहून अंतिम संस्काराचे सामान आणले तसेच चौघांनी जातपात विसरून मृतदेहाला खांदा दिला आणि अंतिम विधीसाठी शव अग्निशमन केंद्राजवळील स्मशानभूमीत नेले. तेथे पहाटे अंतिम विधी होईपर्यंत चौघे थांबले. त्या चौघांपैकी महेशर आणि शाकीब हे दोघे त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मंगळवारी रात्री मुंबईला जाणार होते. लाल यांच्या घरातील घटनेची माहिती मिळताच त्यांनी वाढदिवसाला दुय्यम स्थान देऊन लाल यांच्या अंत्यसंस्काराला प्राधान्य दिले. त्यांच्या या कामाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.