पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:08 PM2022-05-30T22:08:40+5:302022-05-30T22:14:19+5:30

सोमवारी दुपारी विमानाने सुरेश पुनमिया यांच्यासह पाचही मृतदेह ठाण्यात आणण्यात आले.

Funeral on 5 members including four members of Punamiya family; Presence of leaders including former mayors | पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती

पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती

googlenewsNext

ठाणे- सिक्कीम येथे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेले ज्वेलर्स व्यावसायिक सुरेश पुनमिया यांच्यासह पाच जणांवर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जैन धर्मियांसह ठाण्याचे माजी महापौर तसेच लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

ठाण्यातील सुमारे १८ जणांचा गट पाच दिवसांपूर्वी पर्यटनासाठी सिक्कीम येथे गेला होता. यात सुरेश पुनमिया (४०), त्यांची पत्नी तोरन (३७), मुलगी हिरल (१४) आणि देवांशी (१०) तसेच सुरेश यांच्या मित्राचा मुलगा जयंत परमार (१०) या पाच जणांचा समावेश होता. २८ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोटारीने हॉटेलमध्ये परतत होते. त्याचवेळी नॉर्थ सिक्कीम येथे खेडुंग जवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात त्यांची गाडी ६०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये स्थानिक एस. विश्वकर्मा या चालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाता वेळी एकूण तीन वाहने हॉटेलकडे परतत होती. यावेळी दोन गाड्या हॉटेलवर परतल्या. मात्र, पुनमिया यांची गाडी न परतल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो नॉटरिचेबल होता. अखेर याबाबत लष्कराला माहिती देण्यात आली. या नंतर लष्कारासह स्थानिक पोलिसांनी ६०० फूट खोल दरीतून त्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. दरम्यान, सोमवारी दुपारी विमानाने सुरेश पुनमिया यांच्यासह पाचही मृतदेह ठाण्यात आणण्यात आले.

टेंभी नाका येथे तीन रुग्णवाहिकांमधून हे मृतदेह येताच संपूर्ण शहरातील वातावरण शोकाकूल झाले होते. सुरेश पुनमिया, त्यांची पत्नी तसेच दोन्ही मुलींचे मृतदेह टेंभी नाक्याजवळील त्यांच्या घरी आणण्यात आले. तर जयंत परमार याचा मृतदेह एसटी वर्कशॉप आवारातील त्यांच्या घरी नेण्यात आला. सायंकाळी या पाचही मृतदेहांवर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सुरेश पुनामिया यांचे बंधू महिपाल, हसमुख पुनमिया यांचे कुटुंबीय तसेच बहिण चित्रलेखा आणि मेव्हणे जितेंद्र जैन यांच्यासह नातेवाईक त्याचबरोबर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, मनसे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे सचिन शिंदे, घोडबंदर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज जैन, परेश पवार, जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुरेश यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबासह दोन्ही भावांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमचा आधारस्तंभ गेल्याची भावना त्यांचे बंधू महिपाल यांनी व्यक्त केली. अंत्यसंस्कारादरम्यान ठाण्यातील टेंभी नाक्यासह अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी दुकाने सोमवारी बंद ठेवून या कुटूंबाला श्रद्धांजली वाहिली.
 

Web Title: Funeral on 5 members including four members of Punamiya family; Presence of leaders including former mayors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.