ठाणे आयुक्तालयांत निनावी फोन करणाऱ्यास भिवंडीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:31 PM2018-09-14T18:31:26+5:302018-09-14T18:34:21+5:30
भिवंडी: शहरात गणेशोत्सावाची धामधुम सुरू असताना ‘भिवंडीत बॉम्बस्फोट होणार आहे’,असा मोबाईलवरून निनावी फोन करून पोलीसांची धावपळ उडविणा-या एका इसमाला शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी चार तासांत गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या घटनेनंतर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून शहरात अधिक प्रमाणांत पोलीस बंदोवस्त वाढविण्यात आला आला आहे. बासुदेव गौतम राय(४०) असे निनावी फोन करणा-याचे नांव असुन तो मुळ कलकत्ता येथील रहाणारा आहे. पद्मानगर येथील गायत्रीनगरमध्ये सध्या त्याचे वास्तव्य असुन तो यंत्रमाग कामगार आहे. काल गुरूवारी दुपारी शहरातील सर्व पोलीस गणेशोत्सावाच्या बंदोवस्तात असताना त्याने दारूच्या नशेत ठाणे आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोन करून पोलीसांची झोप उडवून टाकली. ठाणे गुन्हे शाखा पोलीसांनी आपल्या तपास यंत्रणेव्दारे सदर मोबाईलच्या घटनास्थळाचा शोध घेतला असता तो भिवंडीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार भिवंडीतील शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्याने तो मोबाईल धारक शहरातील पद्मानगर येथील गायत्रीनगर येथील असल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेत पोलीसांनी चार तासांत आरोपी बासुदेव राय यास दारूच्या नशेत अटक केली. मात्र सणांचे दिवस असल्याने या बाबत पोलीसांनी अत्यंत गुप्तता पाळली. शहर पोलीस ठाण्यात बासुदेव राय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यास पोलीसांनी जेल मध्ये ठेवले आहे.
निनावी फोन करणा-या व्यक्तीस पोलीसांनी अटक केली तरी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून शहरात गणेशोत्सावाच्या निमीत्ताने शहरात सुरक्षीततेच्या उपाय योजना राबविण्यास काल गुरूवार पासुन सुरू केल्या आहेत. आज शुक्रवारी रोजी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन कंपन्या तसेच राज्य सुरक्षा बलच्या चार कंपन्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क ठेवावा.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे,असे आवाहन पोलीसांनी केले आहे.