भिवंडीत प्रचार पडला थंड

By admin | Published: May 20, 2017 04:55 AM2017-05-20T04:55:30+5:302017-05-20T04:55:30+5:30

प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस उरल्याने मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, रोड शो, पदयात्रांसाठी राजकीय पक्षांची धावपळ सुरू असली, तरी भिवंडी शहरातील

The furious campaign was cold | भिवंडीत प्रचार पडला थंड

भिवंडीत प्रचार पडला थंड

Next

- पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस उरल्याने मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, रोड शो, पदयात्रांसाठी राजकीय पक्षांची धावपळ सुरू असली, तरी भिवंडी शहरातील वातावरण शांत आहे. कडाक्याचे ऊन आणि उन्हाळी सुट्टीचा माहोल यामुळे कोठेही निवडणुकीचा फिव्हर दिसत नाही. नोटाबंदीनंतर यंत्रमांगांची धडपड बरीचशी थांबली आहे. तेव्हापासून पसरलेले औदासीन्य साऱ्या शहराला व्यापून उरले आहे.
यंत्रमाग कारखाने, गोदामे यांच्यामुळे कापड उद्योगाचे माहेरघर अशी ओलख असलेल्या भिवंडीच्या धडधडीला नोटाबंदीनंतर उतरती कळा लागली. त्यातच पालिका निवडणुका मागील वर्षीपेक्षा महिनाभर उशिरा झाल्या. तोवर उन्हाळी सुट्यांचा हंगामा सुरू झाला होता. परिणामी, शहर खूपच शांत झाले. ती शांतता पाऊल ठेवताच सर्वत्र जाणवते. एखाद-दोन पक्षांचे मोजके झेंडे वगळता निवडणूक तोंडावर आली आहे याचा मागमूसही दिसत नाही. उमेदवार घरोघर पोचले आहेत. त्यांची पत्रके पोचली आहेत. पण मतदारांत तो उत्साह दिसत नाही. जुम्मे की रात सरली. शुक्रवारी दोन-तीन सभा लागल्या. शनिवार, रविवारीही सभा, रोड शो होतील. त्यामुळे त्याचा बोभाटा करत मधूनच फिरणारी रिक्षा... त्याचे पोस्टर निवडणुकीची माहिती देऊन जातो. प्रचार साहित्याची दुकानेही दुपारच्या जेवणानंतर पहुडलेल्या व्यक्तीसारखी सुस्त... ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शेवटच्या तीन दिवसांत काय होईल ती खरेदी, पण त्यासाठीही ग्राहक अगदी तुरळक. त्यामुळे दुकानदार साहित्य खरेदीसाठी कोणी येते का याच्या प्रतीक्षेत उन्हाच्या झला सोसत बसलेले.
भिवंडीच्या राजकारणाने शहराला काय दिले याचे प्रत्यंतर या वातावरणातून मिळते. मतदार जागृती, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही. एकंदरीतच शहराला आलेल्या अवकळेचे प्रतिबिंब नागरिकांच्या प्रतिसादातून ढळढळीतपणे समोर येते.
मेट्रोचे आश्वासन देण्यावरून शिवसेना-भाजपात चढाओढ सुरू असली, तरी ना रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या; ना केडीएमटी-टीएमटीच्या फेऱ्या... राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने रिक्षांची मुजोरी वाढली. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जैसे थे. उलट अधिक बिकट झालेला. पाण्याचा प्रश्न टंचाईने ग्रासलेला. गटारे, आरोग्य, स्वच्छता, कचऱ्याचा प्रश्न इतका दुर्लक्षित की त्याचे प्रत्यंतर प्रत्येक गल्लीबोळात फिरताना यावे.
राजकीय नेत्यांची बेपर्वाई आणि प्रशासनातील ढिलाईचा परिणाम यामुले नागरिक त्रस्त, व्यापारी हैराण आणि कामगार त्रासलेले ही परिस्थिती सर्वत्र दिसते.



भिवंडीतून भाजपास मतदान करून हीट करा
भिवंडीत भोजपुरी सिनेमांना मोठा प्रतिसाद लाभतो. येथे सिनेमा हीट झाला की, भारतातही तो हीट होतो. त्याच प्रमाणे येथे भाजपास मतदान करून पक्षाला हीट करा, असे आवाहन खासदार तथा अभिनेता मनोज तिवारी यांनी कामतघर येथील सभेत केले. गुरुवारी सायंकाळी कामतघर-ताडाली येथील उत्तर भारतीय मतदारांकरिता भाजपाने तिवारी यांची सभा आयोजित केली होती. ते म्हणाले की, भाजपाने मला दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष करून जबाबदारी दिली आहे.
सध्या दिल्लीतील केंद्र सरकारमध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. आपल्या उत्तर भारतीय बांधवांसाठी मी येथे आलो आहे. खासदार कपिल पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला जागून मी येथे आलो आहे. तो विश्वास टिकवणे ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राने आम्हाला परिवारासारखे स्वीकारल्याने मी महाराष्ट्राला सलाम करतो, असे सांगून त्यांनी मराठी गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. बेटी बचाव मोहिमेचाही यावेळी गौरव झाला.
खासदार कपिल पाटील म्हणाले की, भिवंडीचे स्वरूप बदलण्यासाठी भाजपा जिंकून आली पाहिजे व भाजपाचा महापौर बसल्यानंतर या शहराचा कायापालट होईल,असे आश्वासन दिले.तिवारी यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी १४ वर्षाखालील अल्पवयीन मुलांचा वापर केल्याची तक्रार झाली. पण त्यावर आचारसंहिता पथकाने कारवाई केली नाही. काही उमेदवारांनी परवानगीपेक्षा जास्त ठिकाणी बँनर-पोस्टर लावले असून त्याकडेही निवडणूक विभागाने दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.

जुम्मा तो हर हफ्ते आता है...
भिवंडीत शुक्रवार हा सुट्टीचा वार. त्यामुले जुम्मे की रात प्रचारासाठी गाजवण्याचा प्रयत्न झाला. या दिवशी प्रचाराला रंग चढेल, असे उमेदवारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. पण या दिवशीही शहरावर एकप्रकारचे सुस्तावलेपण होते.
राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शेवटच्या तीन दिवसांसाठी आपल्या सभा लावल्या. त्यासाठी गर्दी गोळा करण्याचे काम दुपारपासून सुरू झाले. पण त्यात जान नव्हती. जुम्मा असल्याने खास तुमच्यासाठी सभा ठेवली आहे, असे कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यावर गल्लीतील महिलेने फणकाऱ्याने ‘जुम्मा तो हर हफ्ते आता है...’ असे उत्तर देत आपल्या भावनेला मोकळी वाट करून दिली.

Web Title: The furious campaign was cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.