‘ड्राय रन’वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:15 AM2021-01-09T01:15:05+5:302021-01-09T01:15:12+5:30

जिल्ह्यात १२ ठिकाणी झाली चाचणी : जिल्हा रुग्णालयात सहा लाख डोसची क्षमता 

The fuss of social distance during 'dry run' | ‘ड्राय रन’वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

‘ड्राय रन’वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी १२ ठिकाणी ड्राय रन मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. तिचा शुभारंभ नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. लसीकरणासाठी ठाणे जिल्ह्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शासनाचे आदेश मिळताच तत्काळ तीस प्रारंभ करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान अनेक ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचये दिसले


प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी, त्याची आव्हाने आणि त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, यासाठी सराव चाचणी घेण्यात आली. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहापूरचे उपजिल्हा रुग्णालय, दिवा अंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ठाणे महापालिका आणि भिवंडी निजामपूर क्षेत्रामध्ये दोन केंद्रावर तर उर्वरित कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एका केद्रांवर अशा १२ ठिकाणी चाचणी घेण्यात आली. कोविड १९ मोहिमेत लाभार्थी नोंदणी, लसीकरण सत्राचे नियोजन, प्रत्यक्ष लसीकरण सत्रासाठी लागणाऱ्या लसीच्या वितरणाच्या नोंदी, लाभार्थ्याला लस दिल्याची नोंद, लसीकरणपश्चात गुंतागुंतीची नोंद आणि लाभार्थीला लस मिळाल्याचे प्रमाणपत्र या सर्व गोष्टी केंद्र सरकारने यूएनडीपीच्या कोविन ॲपद्वारे होणार आहे. या मोहिमेत सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. प्रक्रिया राबविताना काही अडचणी येतात का, हे तपासण्यात आले. लस उपलब्ध झाल्यावर कोणतीही समस्या न येता, सर्व प्रक्रिया सुरळीतपणे करणे सुलभ होईल. प्रत्येक संस्थेत सरावादरम्यान २५ आरोग्य कर्मचारी लाभार्थी म्हणून निवडण्यात आले होते. यात लाभार्थीला प्रत्यक्ष कोणतीही लस किंवा इंजेक्शन न देता, बाकी सर्व प्रक्रियेची पडताळणी करण्यात आली. यामध्ये प्रतीक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष आणि तिसऱ्या खोलीमध्ये निरीक्षणगृहाची व्यवस्था करण्यात आली. लसीकरणानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेऊन लाभार्थ्याला त्रास होतो का, याची तपासणी केली जाणार आहे. त्रास झालाच, तर उपचाराची व्यवस्था करणार आहे. आधी नोंदणी केल्यानुसार ओळखपत्राची पडताळणी करून प्रवेश देणे आदी बाबी यावेळी तपासण्यात आल्या.

n सद्य:स्थितीत ठाणे जिल्ह्यांतर्गत (महानगरपालिका क्षेत्र बगळता) एकूण आठ हजार ८५५ लाभार्थ्यांची कोविन अ‍ॅपमध्ये नोंद झाली असून, महानगरपालिका क्षेत्र धरून ५९ हजार ५७२ नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.


n जिल्हा रुग्णालयात सहा लाख डोस ठेवण्याची क्षमता असून, पाच जणांची टीम १०० जणांचे लसीकरण करील. दिवसाला किमान पाच हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवार यांनी सांगितले. सुरुवातीला आरोग्यसेवा त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.
n जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते, आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड, शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी आदी उपस्थित होते.

डॉ. जिनल रोकडे 
यांना पहिला मान 
यावेळी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉ.जिनल रोकडे यांना लसीकरणाच्या चाचणीचा पहिला मान मिळाला. त्यांच्या नोंदणीनुसार कोविन अ‍ॅपवर त्यांच्या नावाची खात्री केली. त्यानंतर, पुन्हा २८ दिवसांनी दुसऱ्या लसीसाठी येण्याचेही त्यांना सांगण्यात आले. पहिला मान मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

संक्रांतीपासून होणार लसीकरण सुरू?
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने मकर संक्रातीच्या मुहूर्तावर लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्यांनी दिली.  आयुक्तांनी मात्र अशी कोणतीही तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सांगितल्याने संभ्रम कायम आहे.
लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी या बैठकीत दिली. या मोहिमेबाबत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी सविस्तर माहिती दिली. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असून त्यापैकी २५ ते ३० टक्के नागरिकांना पहिल्या टप्प्यात लस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, ५९ वर्षांवरील नागरिक, अतिजोखीम गटातील रुग्ण यांचा समावेश असून शहरातील १६ केंद्रावर लस दिली जाणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. लसीकरण या महिन्यात सुरु होण्याची अपेक्षा आहे. पण तारीख महापालिका स्तरावरून नाही, तर शासनाकडून जाहीर केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The fuss of social distance during 'dry run'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.