फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:42+5:302021-09-02T05:26:42+5:30
कल्याण : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणमध्ये आयोजित गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला ...
कल्याण : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणमध्ये आयोजित गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे सामान्यांना कोरोनाचे नियम सांगणारे प्रशासन आता झोपी गेले आहे का, असा संतप्त सवाल जनसामान्यांकडून केला जात आहे.
कल्याण पश्चिमेतील सॉलिटर हॉलमध्ये जन्माष्टमीचा संगीत कार्यक्रम झाला. त्यात फाल्गुनी पाठक यांची गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यात विशेषत: तरुण-तरुणींचा जास्त समावेश होता. गाणी सुरू होताच अनेकांना त्यांच्या तोंडावर मास्क लावलेला नाही याचा विसर सोयीस्कररीत्या पडला. कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केडीएमसीवर टीका करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. विशेषत: सणानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार अशी दाट शक्यता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेपश्चात सरकारी यंत्रणा कोरोना नियमावली राबविण्यात भेदभाव करीत आहे का, असाच सवाल या घटनेतून उपस्थित केला जात आहे.