दारूच्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:03+5:302021-03-30T04:24:03+5:30
कल्याण : होळीनिमित्त कल्याण-डोंबिवलीतील दारूच्या दुकानांमध्ये रविवारी तळीरामांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काही जणांच्या तोंडावर मास्कदेखील ...
कल्याण : होळीनिमित्त कल्याण-डोंबिवलीतील दारूच्या दुकानांमध्ये रविवारी तळीरामांनी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. काही जणांच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता. एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.
रविवारी सायंकाळी सात वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असताना राजा वाइन शाॅपमध्ये एकच गर्दी दिसून आली. पोलिसांची गाडी येताच दुकान चालकाने शटर बंद केले. मात्र पोलिसांनी दुकान चालकास ताब्यात घेतले. शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने ११ मार्चपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी काढत काही निर्बंध लादले होते. त्यानंतरही रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवारी होळीचा सण आल्याने शनिवारी बंद पाळणाऱ्या दुकानदारांनी रविवारी होळीच्या सणाला शिथिलता द्यावी, अशी मागणी करीत आंदोलन केले. आयुक्तांचा निर्णय योग्य होता. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना एक दिवसाची शिथिलता द्यावी, असे सांगितल्याने रविवारी दुकाने उघडी होती. होळीची सूट घेत दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवली. त्यात दारूच्या दुकानदारांनी चांगली संधी साधली. सोमवारी रंगपंचमीच्या दिवशीही दारूची दुकाने छुप्या पद्धतीने सुरूच असल्याचे दिसून आले.
रविवारचा बंद सोमवारी पाळणार असल्याने कल्याण-डोंबिवलीत अन्य दुकाने बंद होती. रिक्षा, बसेस तुरळक प्रमाणात सुरू होत्या. त्यामुळे रस्त्यावर चार वाजेपर्यंत शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी गल्लीबोळात रंगपंचमी खेळण्यात आली. मित्र, मैत्रिणींनी एकमेकांच्या तोंडाला रंग लावला. रविवारी ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आले. प्रशासनाकडून होळी साजरी करण्याबाबत निर्बंध घातले होते. त्याला फारच कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
.......................
कारवाईचा इशारा
कंटेनमेंट झोनच्या बाहेर मिशन बिगेन्स अगेन नियमावली महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत विविध नियमावली लागू करण्यात आली. नियमावलीचा भंग केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
--------------------