टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांचे भवितव्य ३०६२ मतदारांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:22+5:302021-02-16T04:41:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यातील सर्वात मोठी जिल्हा बँक असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची वार्षिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील सर्वात मोठी जिल्हा बँक असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची वार्षिक उलाढाल तब्बल साडेदहा हजार कोटींची आहे. अशा बँकेची निवडणूक ३० मार्चला असून, तिच्या २१ संचालकांना निवडून देण्यासाठी तीन हजार ६२ मतदार निश्चित केले आहेत. त्यांची अंतिम यादी १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हा बँकांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या टीडीसीसी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातील सहकारी संस्था व संबंधितांकडून मतदार निश्चितीसाठीचे प्रस्ताव विभागीय सहकारी संस्था सहनिबंधकांनी मागितले होते. यानुसार तयार केलेल्या मतदारयादीतील चुकांची दुरुस्तीसाठी संबंधितांनी ५९ हरकती दाखल केल्या होत्या. गेल्या बुधवार, गुरुवार या दोन दिवसांच्या कालावधीत या आक्षेपांवरील सुनावणीत आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानंतर तीन हजार ६२ जणांची अंतिम मतदारयादी तयार झाली. ती मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असे विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर यांनी लोकमतला सांगितले.
टीडीसीसी बँकेच्या निवडणुकीकडे राज्यातील सहकार धुरिणांचे लक्ष लागले असल्याचे बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक रथी,महारथी बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व असून, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र पाटील यांची ओळख आहे. ते गेल्या चार वर्षांपासून अध्यक्षपद सांभाळत आहेत.
बँकेने केलेली नोकरभरती, शेतकरी सोसायटी सचिवांचा पगार बँकेतून करण्याचा निर्णय, कोरोना संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस आदींना भरीव मदत, शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज, पीकविमा वेळेत मिळविण्यासाठी पाठपुरावा, बचतगट, छोटे व्यावसायिक आदींसाठी विशेष कर्ज सुविधा आदींमुळे बँकेचे कामकाज सुलभ झालेले दिसून येत आहे. शेतकरीवर्ग, महिला बचतगट, लघु उद्योजकांना या बँकेचा मोठा आर्थिक आधार मिळत आहे.