निधीअभावी शाळा सुविधांपासून वंचित, २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:58 AM2017-09-02T01:58:08+5:302017-09-02T01:58:10+5:30
महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
भिवंडी : महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
महानगरपालिका शिक्षणमंडळाच्या मराठी ३२, उर्दू् ५०,तेलुगू ११, हिन्दी ५, कन्नड १अशा विविध भाषांच्या एकूण ९९ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थींनी व १४ हजार विद्यार्थी असे २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ९७३ शिक्षकांची आवश्यक्यता असताना ८५६ शिक्षक उपलब्ध आहेत. म्हणजेच ११७ शिक्षक कमी आहेत. त्यापैकी ४५ शाळेत बसायला बेंचेस नाहीत. शालेय साहित्य मनपाकडून मिळत नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर बºयाच शाळांमध्ये शौचालये व बाथरूम नाही, काही शाळांच्या इमारतीचे छत गळत आहेत तसेच विजेची सोय नसल्याने मुलांना अंधारात बसावे लागत आहे तर पंखे सुद्धा सुरू नाहीत.
या सर्व मुलभूत सुविधांसाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. मोहीते यांनी मनपाच्या बांधकाम व इतर विभागाकडे पाठपुरावा करूनही केवळ निधी नसल्याने या सोयीपासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शासनाकडून केवळ ५० टक्के शिक्षकांचे वेतन महानगरपालिकेकडे येत असून उर्वरीत ५० टक्के रक्कम देऊन मनपा शिक्षकांचा मासिक पगार करीत आहे. पूर्वी शासनाकडून ८० टक्के वेतन येत होते.
मात्र, महानगरपालिका झाल्यापासून ५० टक्के वेतन मिळत असल्याने शिक्षकांचे पगारदेखील वेळेवर होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली असून अद्याप मनपाचे शिक्षण मंडळ अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या असुविधेचा सामना करावा लागत असल्याने मनपा शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.