३९० शाळांचे भवितव्य धोक्यात
By admin | Published: September 5, 2015 02:52 AM2015-09-05T02:52:53+5:302015-09-05T02:52:53+5:30
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत
सुरेश लोखंडे , ठाणे
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत. जिल्हाभरात या सुमारे ३९० शाळा बंद होण्याचे संकट असून त्यातील सर्वच शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिका, नगरपालिका क्षेत्रासह आदिवासी, दुर्गम भागातील या ३९० शाळा आहेत. या केवळ ११ व २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत. त्यांच्यावर तर आधीपासूनच बंद होण्याचे संकट ओढवलेले आहे. पण, राज्य शासनाने सुमारे आठवड्याभरापूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार ६० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बंद पडणाऱ्या या शाळांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसारही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शाळा बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यात सध्या चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी आहेत. त्यांना ३९ हजार ८८४ शिक्षक शिकवत आहेत. ११ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या १२१ शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक १०५ प्राथमिक शाळा, पाच उच्च प्राथमिक,दहा माध्यमिक, एका उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे. यातील सर्वाधिक प्राथमिक ५४ शाळा मुरबाड तालुक्यात असून ३२ शाळा शहापूर तालुक्यात आहेत. या खालोखाल भिवंडीला सात, अंबरनाथला पाच, कल्याणला चार, मीरा-भार्इंदरला दोन आणि उल्हासनगरला एक शाळा आहे. याप्रमाणेच २० पेक्षा कमी असलेल्या २६९ शाळा जिल्ह्यात आहेत. यामध्ये २४९ शाळा प्राथमिक आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळा मुरबाडला ९१, शहापूरला ८८, भिवंडीला ३४, कल्याणला १४, अंबरनाथला १३, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई मनपा क्षेत्रात प्रत्येकी तीन शाळांचा समावेश आहे. ठाणे, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिकेत एक शाळाआहे.