मतदानाच्या टक्केवारीवर ठरणार भिवंडीच्या रणांगणातील उमेदवारांचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:16 AM2019-04-23T02:16:21+5:302019-04-23T02:16:43+5:30
कसे असणार मतांचे गणित; भिवंडी पूर्व, पश्चिमची रणनीती ठरणार निर्णायक
- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निर्णायक मतदान करणाऱ्या भिवंडी शहरातील मतदारांसाठी उमेदवारांनी चांगलीच फिल्डिंग लावली, तरी मतदानाचा टक्का किती होणार, यावर निकालाचे गणित ठरणार आहे. भिवंडी शहर व परिसरांत भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन मतदारसंघ असल्याने उमेदवारांनी प्रचाराचा शेवटचा टप्पा भिवंडीत ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून भिवंडीबाहेरील शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम मतदारसंघांत भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी लक्ष वेधले होते. त्यापैकी कपिल पाटील यांनी भिवंडीतील तीनही मतदारसंघांत आपल्या पहिल्या फेरीचा प्रचार रॅलीद्वारे केला आहे.
भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे आमदार महेश चौघुले, तर भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे रूपेश म्हात्रे आहेत. दोन्ही मतदारसंघ युतीकडे असले, तरी या मतदारसंघात काँग्रेसचे पारंपरिक मुस्लिम मतदार आहेत. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे यांना भिवंडी पूर्वमध्ये ३२,५०३ मते, तर भिवंडी पश्चिममध्ये ४४,१५३ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपचे जगन्नाथ पाटील यांना भिवंडी पूर्वमध्ये १४,७०७, तर पश्चिममध्ये १४,४०३ मते मिळाली होती. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना भिवंडी पूर्वमधून ५९,५६२, तर भिवंडी पश्चिममधून ६१,८९५ मते मिळाली होती.
भाजपचे कपिल पाटील यांना भिवंडी पूर्वमधून ४०,४२१ तर भिवंडी पश्चिममधून ४२,३९८ मते मिळाली होती. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कामांचा विचार करून मतदार मतदान करतील. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेससाठी पोषक वातावरण असले, तरी यावेळी भाजपला मतदारांचे मन वळवण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. २०१४ मध्ये कपिल पाटील यांनी या भागातील मते गृहीत न धरता कल्याण पश्चिम, मुरबाड व भिवंडी ग्रामीणकडे लक्ष केंद्रित करून बाजी मारली होती. परंतु, यावेळी भिवंडी पूर्व व पश्चिमची मते निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने भाजप महायुतीने या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
तीन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गाव
कपिल पाटील हे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. त्यांच्यासोबत ग्रामीण कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांची भिवंडी ग्रामीणमध्ये चांगली पकड आहे. मुरबाड व कल्याण पश्चिममध्येदेखील त्यांनी मागील निवडणुकीत चांगली मते घेतल्याने त्यांना यावेळीही साथ मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. ती भाजपसाठी मोठी जमेची बाजू आहे.
सुरेश टावरे यांची भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम मतदारसंघांवर चांगली पकड आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. शहापूर येथे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा असल्याने त्या मतदारांचादेखील आघाडीला लाभ होणार आहे. स्थानिक समीकरणामुळे हे मतदारसंघ काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
2009
साली काँग्रेसचे सुरेश टावरे यांना एकगठ्ठा मते मिळाली होती. त्यामुळे मतदानाची दिशा बदलली.
2014
साली भिवंडी ग्रामीण, मुरबाड, कल्याण पश्चिममध्ये आघाडी घेत भाजपचे कपिल पाटील निवडून आले होते.