कंत्राटी वाहनचालकांचे भवितव्य अधांतरीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:03+5:302021-05-20T04:44:03+5:30

कल्याण : केडीएमसीत कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या ठोकपगारी वाहनचालकांची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी ...

The future of contract drivers is uncertain! | कंत्राटी वाहनचालकांचे भवितव्य अधांतरीतच!

कंत्राटी वाहनचालकांचे भवितव्य अधांतरीतच!

Next

कल्याण : केडीएमसीत कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या ठोकपगारी वाहनचालकांची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी मुदतवाढ न मिळाल्यास त्यांच्या मासिक वेतनावर परिणाम होतो. दरम्यान, त्यांना सेवेत कायम करून त्याप्रमाणे वेतन लागू करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दीड वर्षापूर्वी मनपाला दिले होते. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. एकूणच सद्य:स्थिती पाहता या चालकांचे भवितव्य अधांतरी दिसत आहे.

माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात डिसेंबर २०१२ मध्ये १०५ वाहनचालक कंत्राटी पद्धतीने सहा महिने कालावधीसाठी दरमहा १० हजार रुपयांच्या मानधनावर महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले. सद्य:स्थितीला ८९ वाहनचालक कार्यरत आहेत. बहुतांश चालक घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असून, काहीजण अग्निशमन दलाच्या सेवेत कर्तव्य बजावत आहेत. सध्या ते किमान वेतन धोरणानुसार दरमहा १६ हजार २०० रुपये मानधनावर काम करीत आहेत. दर सहा महिन्यांनी या ठोकपगारी वाहनचालकांना मुदतवाढ दिली जाते. दरम्यान, त्यांचा कालावधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येत आहे. त्यांची सेवा एक दिवस खंडित करून पुढील सहा महिने कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाते. मागील वर्षी मुदतवाढ प्रस्तावाला मंजुरी उशिराने मिळाल्याने त्यांचे तीन महिन्यांचे मानधन खोळंबले होते. त्यामुळे यंदा जूनमधील मुदतवाढ संपण्यापूर्वीच मुदतवाढ मिळावी अशी मागणी वाहनचालकांची आहे.

दरम्यान, दीड वर्षापूर्वी सेवेत कायम करून घेण्यासंदर्भात वाहनचालकांच्या बाजूने निर्णय लागला आहे. सेवेत कायम करण्याबरोबरच त्याप्रमाणो वेतनही लागू करण्यासंदर्भात औद्योगिक न्यायालयाने मनपाला आदेश दिले आहेत. परंतु, यासंदर्भात कोणतीही कृती प्रशासनाकडून झालेली नाही. दोन महिन्यांपूर्वी मनपाला यासंदर्भात नोटीसही बजावली गेली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

-----------------

न्यायालयात आव्हान

औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ठोकपगारी वाहनचालकांची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येत आहे. तत्पूर्वीच त्यांना मुदतवाढ दिली जाईल.

- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, सामान्य प्रशासन, केडीएमसी

----

Web Title: The future of contract drivers is uncertain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.