वनविभाग ठरविणार दिवा डम्पिंगचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:56 PM2020-01-02T23:56:59+5:302020-01-02T23:57:06+5:30
आंदोलन तूर्तास स्थगित; पालिका उपायुक्तांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय
ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ जाणार असून आजही येथील उर्वरित जागेवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर कचऱ्याचा एकही डम्पर दिव्यात येऊ देणार नसल्याचा इशारा स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला होता. गुरुवारी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित केल्याचे स्पष्ट करत मढवी यांनी तलवार म्यान केली आहे. पुढील आठवड्यात नागपूरची वारी करून वनविभागाची एनओसी आणली जाणार असल्याने हे आंदोलन स्थगित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील महिन्यात झालेल्या महासभेत दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी आला असता स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी विरोध केला. यासाठी केला जाणारा खर्च हा खूप वाढीव असल्याचा दावा राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला होता. ही चर्चा सुरू असतानाच दिव्यातील नगरसेवक आक्रमक झाले. त्यातच दिव्यातील डम्पिंग बंद नाही झाले, तर ३१ डिसेंबरनंतर या भागात महापालिकेचा कचºयाचा एक डम्परही फिरकू देणार नसल्याचा इशारा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला होता.
वनविभाग एनओसी देणार काय?
मढवी यांनी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेऊन डम्पिंग केव्हा बंद होणार, असा सवाल केला. त्यानंतर, वनविभागाची जागा डम्पिंगसाठी प्रस्तावित असून त्याची एनओसी घेण्यासाठी पुढील आठवड्यात मढवी स्वत: उपायुक्तांसह नागपूरवारीला जाणार आहेत.
त्यानंतर, कदाचित येत्या काही दिवसांत दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न तात्पुरता सुटू शकतो, अशी शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. येत्या वर्षभरात डायघरचा प्रकल्पही सुरू होणार असल्याने कचºयाची समस्या मार्गी लागेल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
एकूणच हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे मढवी यांनी स्पष्ट केले. मात्र, सीआरझेडसह केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या जाचक अटी पाहता वनविभाग एनओसी देणार का, हा प्रश्न असून त्यावरच दिवा डम्पिंगचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.