जी. आर. पाटील महाविद्यालयावर पुन्हा हातोडा
By admin | Published: February 2, 2016 01:55 AM2016-02-02T01:55:44+5:302016-02-02T01:55:44+5:30
आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेल्या जी.आर. पाटील महाविद्यालयावर कारवाई होऊन चार दिवस होत नाही, तोच या महाविद्यालयाने पुन्हा बांधकाम करण्यास सुरुवात केली होती.
अंबरनाथ : आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे उभारलेल्या जी.आर. पाटील महाविद्यालयावर कारवाई होऊन चार दिवस होत नाही, तोच या महाविद्यालयाने पुन्हा बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पालिकेची कारवाई ही दिखावा असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यासंदर्भात लोकमतमध्ये ‘देशमुखांना विश्वासार्हतेचे आव्हान’ या वार्तापत्राच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याधिकाऱ्यांनी या इमारतीवर पुन्हा कारवाई केली.
गेल्या आठवड्यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी सपाटा लावून अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येथे बांधकामे होत असल्याने पालिकेच्या कारवाईबाबत विश्वासार्हता कमी झाली होती. त्यातच मुख्याधिकाऱ्यांच्या कामाच्या शैलीला अनुसरून इतर अधिकारी काम करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
पूर्व विभागातील ग्रीन सिटी परिसरात असलेल्या मैदानाच्या आरक्षित भूखंडावर ज्या जी.आर. पाटील महाविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम केले होते, त्यावर पालिकेने कारवाई केली. कारवाईच्या चार दिवसांनंतर संबंधित संस्थेने लागलीच पुन्हा या महाविद्यालयाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे हे महाविद्यालय पुन्हा चर्चेत आले होते. अखेर, पालिकेने सोमवारी पुन्हा कारवाई करून इमारतीचे कॉलम तोडण्याची कारवाई केली.