सिमांकन निश्चित करण्यासाठी गावठाण, कोळीवाड्यातील रहिवाशांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:53 PM2019-01-05T17:53:03+5:302019-01-05T17:55:47+5:30
महापालिकेने गाठवाण कोळीवाड्यांचा विरोध डावलून क्लस्टरसाठी बायोमेट्रीक सर्व्हे करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.
ठाणे - ठाण्यातील गावठाण कोळीवाड्यातील सीमांकनाची समस्या तसेच सीमांकन निश्चत झाल्याशिवाय क्लस्टर योजना राबविण्यात येऊ नये, आदींसह इतर मागण्यांचे निवेदन ठाण्यासह जिल्ह्यातील गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.
यावेळी बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कोळीवाडे व गावठाणातील भूमिपुत्र बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत बाळकुम येथील विविध कंपनीने स्थानिक शेतकºयांच्या जमिनीचे केलेले भूसंपादन या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.परंतु हा विषय किचकट आणि गुंतागुंतीचा असल्याने त्यावर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. क्लस्टर योजना व कोळीवाडा गावठाण विस्तारीत सिमांकन या विषयावर चर्चा करताना महसूलमंत्री व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ठाणे शहरातील कोळीवाडे व गावठाण क्लस्टर योजनेतून वगळण्यात आली आहेत तरी देखील ठाण्यातील हजुरी गावठाण हे क्लस्टर योजनेत घेण्यात आले आहे. त्यामुळे ते वगळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच आपल्या व महसूल विभागाच्या अख्यारित असलेल्या नगर भू मापन विभागामार्फत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोळीवाडे व गावठणांचे विस्तारित सिमांकन पूर्ण होत नाही तोवर चेंदणी कोळीवाडा, राबोडी व हाजुरी या परिसरात ठाणे महापालिकेतर्फे सुरू होणारे बायोमेट्रिक सर्वेक्षण करु नये अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय कोस्टल रोड, मेट्रो कास्टिंग यार्ड, कांदळवन, ग्रामविकास सोसायटी या विविध विषयावरंवर सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली.