गडचिरोलीमध्ये नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहनासाठी बक्षीस देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 05:46 PM2021-11-14T17:46:07+5:302021-11-14T17:52:52+5:30
Gadchiroli Encounter :पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : सी ६० कमांडोंचे केले अभिनंदन
ठाणे : गडचिरोलीतील नक्षली चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती गडचिरोली तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली. गेल्या काही वर्षामध्ये गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून दूर जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे मार्गक्रमण करीत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी दहा कोटींची तरतूद केल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्तीसगढच्या सीमेवरील गडचिरोलीमध्ये झालेली ही चकमक सुमारे दहा तास सुरू होती. या कारवाईची सर्वच राज्यांनी दखल घेतली आहे. या चकमकीत माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. गेल्या काही दिवसांमधील नक्षलविरोधी कारवायांमधील ही एक मोठी कारवाई आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सी ६० कमांडोंचे या वेळी शिंदे यांनी अभिनंदन केले. चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
सुरजागढ येथे सुरु केलेल्या लोहखनिज प्रकल्पामुळे पाच हजार स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोलीचा चेहरामोहराच बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना पक्की घरे तसेच जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना आपले आयुष्य नव्याने सुरु करण्याची संधी दिली जाते. नक्षलविरोधी कारवायांमध्ये जखमी जवानांवर तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आहे. दुर्गम भागातील गस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २३ मोटारी दिल्या आहेत. मोहफुलावरील निर्बंध उठवून मोहफुलांचे पौष्टिक लाडू तसेच इतर पोषणमूल्यवर्धित उत्पादनास प्रोत्साहन दिले. कोरची येथील जांभळांना नागपूरच्या बाजारपेठेत पाठविण्याची सोय उपलब्ध करून २० रुपयांऐवजी ११० किलोचा विक्रमी भाव मिळवून दिला. नफा देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचेही शिंदे या वेळी म्हणाले.