ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:20 PM2019-01-19T15:20:10+5:302019-01-19T15:22:32+5:30
ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली.
ठाणे : ग.दी. माडगूळकर मराठी भाषेला पडलेलं एक सुंदर स्वप्न. गीत, कथा, पटकथा, कविता, मराठी साहित्यातील जणू काही प्रत्येक प्रकारात आपली महारथ सिद्ध केलेले एक सिद्धहस्त व्यक्तिमत्व.मराठी रसिकांच्या वाचकाच्या मानामनावर राज्य करणारा एक अवलिया. गीत रामायणाचा आविष्कार करणारा आधुनिक वाल्मिकी.शब्दांच्या आणि छंदांच्या राज्यात वावरणारा साहित्यविश्वातील स्वामी. वाचक कट्टा क्रमांक ३२ वर गदिमांच्या कलाकृतींचे अभिवाचन करून अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी गदिमांना शब्द सुमनांजली वाहिली.
शनी जाधव ह्याने 'देवाचे घर' , अतिष जगताप ह्याने 'गुरुविण कोण दाखवील वाट','आई', आरती ताथवडकर ह्यांनी 'काय वाढले पानावरती', शुभम कदम ह्याने 'असे आमुचे पुणे', ओमकार मराठे ह्याने 'जिंकू किंवा मरू',सई कदम हिने 'एक तळ्यात होती बदके पिले सुरेख' ,प्रतिभा घाडगे ह्यांनी 'मनोहर',विजया साळुंखे हिने 'जन्म-मृत्यु','डोळे तुझे असे',आणि परेश दळवी ह्याने 'जत्रेच्या रात्री','दिसे ही साताऱ्याची तऱ्हा', 'सुख' ह्या कवितांचे सादरीकरण केले.कदिर शेख ह्याने सादर केलेली 'तू जग तुला हवं तसं' जगण्याचा अर्थ उलगडून गेली. वैभव पवार ह्याने 'गदीमांचा जीवन प्रवास', धनेश चव्हाण ह्याने 'गदिमांच्या आयुष्यातील किस्से', सहदेव साळकर ह्याने 'असे होते गदिमा', कुंदन भोसले ह्याने 'गदिमांचा अंगठा' हे गदिमांचे किस्से अभिवाचनातून सादर केले. रोहित सुतार ह्याने सादर केलेल 'विठ्ठला तू वेडा कुंभार', श्रीकांत लोहकरे ह्यांनी सादर केलेले 'प्रथम तुझं पाहता' ,आणि शुभांगी भालेकर ह्यांनी सादर केलेली 'ऐराणीच्या देवा तुला', 'चांदोबा',आणि 'ज्ञान मंदिरा' ही गीते सादर केली. राजन मयेकर ह्यांनी गीतरामायनातील एक काव्य सादर करून श्रोत्यांची विशेष दाद मिळवली. ह्या सर्व गीतामधून संगीत क्षेत्रातील गदिमा वाचक कट्ट्यावर अनुभवायला मिळाले. सदर वाचक कट्ट्याचे निवेदन प्रथमेश मंडलिक ह्याने केले. निवेदनातून विविधरंगी गदिमा त्याने प्रेक्षकांसमोर मांडले.वाचक कट्टा क्रमांक ३२ ची सुरुवात ज्येष्ठ बालसाहित्यिक गीता जोशी ह्यांच्या हस्ते झाली.इंग्रजीच्या भडीमारात मराठी भाषेच्या अस्तित्वाची ज्योत जपण्याच काम वाचक कट्टा खूप चांगल्या पद्धतीने करत आहे , असे मत त्यांनी व्यक्त केले. गदीमा जन्मशताब्दी निमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांच्या लेखणीतून अवतरलेली कविता, गीत, लेख ह्यांचे सादरीकरण होताना कलाकारांना आणि रसिक श्रोत्यांना गदिमा समजले अनुभवता आले हेच गदिमा जन्मशताब्दी वाचक कट्टयाचे यश आहे, असे मत वाचक कट्ट्याचे संचालक किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.