गडकरी रंगायतन अतिधोकादायक वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:24 AM2020-12-14T00:24:07+5:302020-12-14T00:24:10+5:30
नवीन वास्तू बांधा; जाधव यांची मागणी
ठाणे : शहरात नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनची वास्तू आता अतिधोकादायक वास्तूंच्या यादीत आली आहे. ठाण्याच्या इतिहासात या वास्तूने मानाचा तुरा रोवला आहे. या वास्तूची वारंवार डागडुजी करून पुन्हा पुन्हा ती नाट्यरसिकांसाठी खुली करण्यात येत आहे. वास्तविक पाहता ही वास्तू पाडून पुन्हा नव्याने उभारण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता त्याची तात्पुरती मलमपट्टी करून नाट्यरसिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. यामुळे तिची डागडुजी न करता ती नव्याने उभारावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गडकरी रंगायतन उभे आहे. ही वास्तू उभारून आता २५ वर्षांपेक्षा जास्तीचा काळ लोटला आहे. त्यातही तिची अनेक वेळा डागडुजी केली आहे. त्यामुळे ती धोकादायक स्थितीत आली आहे. मागील वर्षी दोन वेळा तिचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. या दोनही ऑडिटमध्ये ही वास्तू ‘अतिधोकादायक’ झाली असून ती पाडून पुन्हा उभारावी, असे स्पष्ट केले आहे.
या नाट्यगृहात १२०० च्या आसपास रसिक विविध नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी येत असतात. परंतु, ही वास्तू अतिधोकादायक झाल्याने भविष्यात एखादा प्रयोग सुरू असताना काही हानी झाली तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? याचेही उत्तर द्यावे, असेही त्यांनी या पत्रात नमूद
केले आहे.