गडकरी रंगायतनला १६ कोटी खर्चून मिळणार नवे रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 03:26 AM2018-08-15T03:26:57+5:302018-08-15T03:27:44+5:30
ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या गडकरी रंगायतनच्या वास्तुला ४० वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु, कालौघात तिची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे.
ठाणे - ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या गडकरी रंगायतनच्या वास्तुला ४० वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु, कालौघात तिची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या वास्तुचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर त्याची डागडुजी करता येऊ शकते, असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता १६ कोटी खर्चून तिचे रूपडे पालटण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
या इमारतीचे मजबुतीकरण, नुतनीकरण, टॉयलेट दुरुस्ती व नुतनीकरण, संपूर्ण प्लबिंग व ड्रेनेज सिस्टिमचे नुतनीकरण, संपूर्ण इमारतीचे रंगकाम, आॅडिटोरीअमचे फॉल सिलिंग व वॉल क्लॉडिंग, इमारतीच्या बाहेरील बाजूला वॉल क्लॅडिंग करणे, खुर्च्या बदलणे, कारपेट नवीन टाकणे, स्टेजचे नुतनीकरण व पडद्याचे काम करणे, इमारतीच्या संरक्षक भिंतीचे व फेन्सिगचे काम करणे, सुरक्षारक्षक केबिन व बाहेरील बाजूस टॉयलेट बांधणे, अग्निशमन यंत्रणा बसविणे, विद्युत कामे, सीसीटीव्ही बसविणे, एसी बसविणे, वार्षिक देखभाल पुढील ३ वर्षांकरीता तांत्रिक सल्लागार असा एकूण १६ कोटी ३१ लाख ६० हजारांचा खर्च या कामी केला जाणार आहे.