तणावमुक्तीसाठी गायमुखची खाडी ठाणेकरांना वरदान ठरणार: एकनाथ शिंदे
By जितेंद्र कालेकर | Published: September 1, 2024 07:45 PM2024-09-01T19:45:09+5:302024-09-01T19:45:56+5:30
ठाण्याचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देणार: जिम्नॅस्टीक सेंटरसाठी आणखी भरीव निधी देणार
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याचे खेळाडू जिम्नॅस्टीकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत आहेत. हा ठाण्याचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाच सुवर्णपदके मिळाली आहेत. ठाण्याच्या जिम्नॅस्टीक सेंटरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर नागला बंदर, गायमुख खाडीची चौपाटी ही धकाधकीच्या जीवनामध्ये तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओवळा माजीवडा मतदारसंघातील ठाणे महापाालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. ठाण्यातील वर्तकनगर भागात नव्यानेच उभारलेल्या जेष्ठ कवी साहित्यिक स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टीक सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, या जिम्नॅस्टीक सेंटरमधून भविष्यात मोठे खेळाडू घडतील. जगभरात नाव उंचावतील, असा विश्वास आहे. मुख्यमंत्री ठाण्याचेच आहेत. त्यामुळे ठाण्याच्या विकासासाठी सरकार कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, नागला बंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुखचे दुसऱ्या टप्याचा लोकार्पण आणि तिसऱ्या टप्याचे भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. धकाधकीच्या जीवनात सध्या विरंगुळाही आवश्यक आहे. ही गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणार आहे. ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ठाण्यात एक लाखांहून अधिक झाडे महापालिकेने लावल्यामुळेच हवाई प्रवास करतांना ठाण्याचं दृश्य विहंगमय दिसते, असेही ते म्हणाले. उद्याने, सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत. पण त्यांचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त सौरभ राव आदी यावेळी उपस्थित हाेते.
यावेळी चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर व प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, शिवाईनगरातील स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन आणि समतानगरातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठीच्या इमारतीचे डिजिटल लोकार्पणही यावेळी पार पडले.
.
१२ समाजासाठी बहुउद्देशीय इमारत -
कासारवडवली, आनंदनगर भागात १२ राज्यासाठीच्या १२ समाजाच्या १२ मजली इमारतीच्या समाज भवनाच्या भूमिपूजन सोहळाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारचे प्रतिपादन प्रथमच साकारत असून हा सुवर्णक्षण असल्याचे ते म्हणाले.
नुसता अंगठा नको- प्रताप सरनाईक
याच भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रमात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच नुसता अंगठा नको. आणखी निधी हवा, अशी मागणी करीत काहीशी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांना आणखी थाेडा म्हस्का लावा, असे साकडेही त्यांनी खासदार नरेश म्हस्के यांनाच घातले. त्यावेळी कार्यक्रमात श्रोत्यांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
ठाण्यात साडे चार काेटींच्या खर्चातून प्रशिक्षण केंद्र-
ठाणे महापालिकेतर्फे वर्तकनगर खेळाचे मैदान या आरक्षित भूखंडावर सुमारे साडे चार काेटींच्या खचार्तून टीडीआरमार्फत डॉ. सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तिरंदाजीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
भूमिपूजन
१. ‘महापालिकाक्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने’अंतर्गत, नागला बंदर येथील खाडीकिनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
२. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधी नगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास होणार आहे. तेथील ३५३ झोपडपट्टीधारकांचे सहा इमारतींमध्ये पुनर्वसन हाेणार आहे.
३. वसंतविहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
४. कासारवडवली येथे सुविधा भूखंडांवर विविध समाजांच्या भवनांची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.