इमारतीची गॅलरी कोसळली; उल्हासनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:13 AM2019-09-28T01:13:52+5:302019-09-28T01:13:55+5:30
रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले
उल्हासनगर : कॅम्प नं-२, गुजराथी शाळेजवळील साई कुटीर या सहा मजली इमारतीची गॅलरी शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान कोसळली. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत रिकामी केली असून आयुक्त सुधाकर देशमुख यांनी इमारतीची पाहणी केली.
उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न जैसे थे असून गुजराथी शाळेजवळील सहा मजल्यांच्या साई कुटीर इमारतीमधील पहिल्या मजल्याची गॅलरी दुपारी कोसळली. या प्रकाराने इमारतीमधील कुटुंबांत भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक मजल्यावर एकच सदनिका, तर तळमजल्यावर सात दुकाने आहेत. एकूण सहापैकी तीन कुटुंबे यापूर्वीच इमारत सोडून गेले आहेत. इमारत धोकादायक यादीत नसल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. शिंपी व भगवान कुमावत यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीमधील कुटुंबांना बाहेर काढून आयुक्तांच्या आदेशानुसार इमारत सील केली. सर्व कुटुंबे श्रीमंत असून त्यांना पर्यायी इमारतीत स्थलांतरित केले आहे. आयुक्त देशमुख यांनी साई कुटीर इमारतीची पाहणी करून इमारतीभोवती संरक्षण कठडे उभारले. काही वर्षांपूर्वी साई कुटीर इमारतीशेजारील शिशमहल इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा बळी गेला होता. तसेच परिसरातील अनेक इमारती महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. १९९० ते ९५ दरम्यान रेती बंद असताना दगडाचा चुरा व वालवा रेतीपासून बनवण्यात आलेल्या बहुतांश इमारती धोकादायक होत असून साई कुटीर इमारतही याचदरम्यान बांधण्यात आली आहे. मात्र, ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नव्हती. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून २० वर्षे जुन्या सर्वच इमारतींचे सर्वेक्षण पालिकेने सुरू केले आहे.
धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी शक्य?
शहरातील धोकादायक व ३० वर्षे जुन्या इमारतींची पुनर्बांधणी शक्य आहे. राज्य सरकारने काढलेल्या विशेष अध्यादेशात फेरबदल करून धोकादायक व ३० वर्षे जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीला राज्य सरकारने मंजुरी दिली. तसेच वाढीव चार चटईक्षेत्र देण्यात आले.