बनावट पावत्या बनवून वीजग्राहकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:10+5:302021-03-16T04:41:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून ग्राहक व महावितरणची फसवणूक करणाऱ्या एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून ग्राहक व महावितरणची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला उल्हासनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (उल्हासनगर कॅम्प - ३) असे त्या भामट्याने नाव असून, त्याने आतापर्यंत ७ ग्राहकांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
तेथील साईबाबा मंदिर परिसरात वसुली मोहिमेवर असलेले वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक किशोरकुमार जयकर व त्यांच्या पथकाला एका थकबाकीदार ग्राहकाने वीजबिल भरल्याची पावती दिली. संबंधित पावती बनावट असल्याची कल्पना देऊन पथकाने संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अशा आणखी सहा - सात तक्रारी महावितरणकडे आल्या. या ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या वीजबिलाचा भरणा करण्यासाठी त्याने दीड लाख रुपये घेतले. मात्र, ही रक्कम महावितरणकडे जमा न करता परस्पर हडप केली व बनावट पावत्या देऊन ग्राहकांचीही फसवणूक केली. जयकर यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात श्रीवास्तवविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून, आरोपीला अटक केल्याचे महावितरणने सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.
पोलीस तपासातून फसवणूक झालेले आणखी काही ग्राहक निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातच करून छापील भरणा पावती घ्यावी.