अंबरनाथ पालिकेच्या गाळ्यांमध्ये जुगाराचे अड्डे अन् दारूचा गुत्ता; पालिका प्रशासन अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:54 AM2022-03-25T10:54:27+5:302022-03-25T10:54:51+5:30
अंबरनाथ : अंबरनाथच्या मुख्य रिक्षा स्टँडजवळील नगरपालिकेच्या मालकीचे असलेले १९ गाळे परस्पर विकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या ...
अंबरनाथ : अंबरनाथच्या मुख्य रिक्षा स्टँडजवळील नगरपालिकेच्या मालकीचे असलेले १९ गाळे परस्पर विकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या या गाळ्यांमध्ये चक्क जुगाराचे अड्डे भरविण्यात आले असून काही गाळ्यांमध्ये मटकादेखील खेळविण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर या गाळ्यांमध्ये चक्क दारूचे दुकानही थाटण्यात आले आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील मुख्य स्टेशन चौकात रिक्षा स्टँडला लागूनच पालिकेचे १९ गाळे असून, हे गाळे पालिकेने तीन वर्षांच्या भाडेकरारावर दिले होते. १९९२ पासून या गाळ्यांचे भाडे येणे बंद झाले होते. भाडेतत्त्वावर दिलेल्या या गाळ्यांचा परस्पर खरेदी-विक्रीचा व्यवहारदेखील झाला असून हे गाळे भाडेधारकांनी परस्पर इतरांना विकल्याची बाब समोर आली आहे. या गाळ्यांचे दोन ते तीन वेळा हस्तांतरण झाले असून याची कोणतीही कल्पना पालिका प्रशासनाला नाही. या गाळ्यांचे भाडे आकारण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. अवघ्या तीन हजार रुपये भाडेतत्त्वावर हे गाळे देण्यात आले असून तेदेखील पालिकेकडे जमा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, पालिकेच्या या गाळ्यांमध्ये चक्क जुगाराचे अड्डे भरवण्यात आले आहेत. काही गाळ्यांमध्ये दिवस-रात्र मटक्याचे अड्डेदेखील भरविण्यात येत आहेत. पोलीस चौकीला लागूनच हे जुगाराचे अड्डे सुरू असून, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पालिका प्रशासनानेही याप्रकरणी ठोस कारवाई केलेली नाही. पालिकेच्या या मालमत्तेत वाईन शॉपदेखील थाटण्यात आले असून त्याचीही कल्पना पालिका प्रशासनाला नाही.