खेळाचं मातीशी नातं तुटत चाललंय !
By Admin | Published: December 28, 2015 02:02 AM2015-12-28T02:02:15+5:302015-12-28T02:02:15+5:30
इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली
वसई : इंटरनेटच्या जमान्यात आता खेळाचं मातीशी नातं तुटतं चाललंय. कबड्डी आणि खो-खो सुद्धा मातीत खेळलं जात नाही. बुट आले आणि माती गेली. मातीचा स्पर्शसुद्धा होऊ दिला जात नाही. कारण मॅट सारख्या बाबींचा वापर होतो. , अशी खंत सिने दिग्दर्शक-कलावंत मकरंद देशपांडे यांनी वसईत २६ व्या कला-क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली.
५० हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेल्या २६ व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे काल वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावर शानदार उद्घाटन झाले. क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून तर अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे आणि अमोल गुप्ते यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. अभिनेता आयुुष टंडन, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील, माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस, आयुक्त सतीश लोखंडे, महोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ आणि कार्याध्यक्ष हेमंत म्हात्रे यावेळी उपस्थित होते.
मुंबईत आता क्रीडांगणे नावापुरतीच उरली आहेत. क्रीडेचा मातीशी संपर्क तुटला असून आता माती नसलेल्या मैदानात बुट घालून खेळ खेळले जातात, अशी खंत व्यत करताना देशपांडे यांनी कलेत चुकलं तर चालतं. पण क्रीडेत चुकीला माफी नसते. याठिकाणी कला-क्रीडेचा सुंदर समन्वय साधला गेला आहे,असे गौरवोद्गार काढले. महोत्सव एक सुंदर इव्हेंट असून त्यातून कला-क्रीडा जोपासण्याचे काम केले जात आहे. इथून प्रत्येक जण काही ना काही शिकून जातो, असे गौरवोद्गार अमोल गुप्ते यांनी काढले. धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, आयुष टंडन यांनी आपल्या छोटेखानी भाषणात महोत्सवाचे कौतुक केले.
पाहुण्यांच्या हस्ते वसईत तालुक्याातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय चौधरी, अमन चौधरी. तेरेजा डिसोझा, हार्दीक पाटील शुभम वनमाळी, हर्षद म्हात्रे, रवींद्र माने, मुग्धा लेले, प्रा. माणिक दोतोंडे, रमाकांत वाघचौडे आदींचा गौरव करण्यात आला. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात पाक कला, बॉक्सिंग, पुष्परचना, वेशभूषा, सॅलेड डेकोरेशन, शरीरसौष्ठव, प्रश्न मंजूषा, मेंदी, भजन, मूकाभिनय, पारंपारिक वेशभूषा, वादविवाद यांच्यासह ३४ काल आणि ३४ क्रीडा मिळून एकूण ६८ प्रकारात स्पर्धा होणार आहेत. (प्रतिनिधी)