प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:29 PM2020-09-10T23:29:18+5:302020-09-10T23:29:24+5:30
दोनऐवजी तीन प्रवासी बसवून जास्त भाडे लाटतात
डोंबिवली : कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता आरटीओने रिक्षात केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम केला असताना काही रिक्षाचालक तीन प्रवासी बसवून दुप्पट भाडे आकारत आहेत. रिक्षा बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्याकरिता काही रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे डोंबिवलीकर नाराज व भयभीत झाले आहेत.
डोंबिवलीत दूरच्या अंतराकरिता शेअर पद्धतीने रिक्षा चालवण्यात येत होत्या. मात्र, कोरोना महामारीनंतर जेव्हा रिक्षांची वाहतूक सुरू झाली, तेव्हा केवळ दोघांना बसण्याची परवानगी आरटीओने दिली. मात्र, काही रिक्षाचालक तीन किंवा चार प्रवासी बसवत आहेत. मानपाडा येथून पलावा येथे जाण्यासाठी अगोदर २० रुपये घेतले जात होते. केवळ दोन प्रवासी बसवायचे, या नियमामुळे रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट वाढवून ४० रुपये केले. नंतर ते नियमही धाब्यावर बसवून तीन प्रवासी बसवले जात आहेत. त्यामुळे भाडे दुप्पट व प्रवासीही तीन बसवायचे, अशी हडेलहप्पी काही रिक्षाचालकांनी सुरू केली आहे.
प्रवाशांची लूट करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मुंबई प्रवासाकरिता जून, जुलै महिन्यांत अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच परवानगी होती. परंतु, आॅगस्टपासून खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली. त्यासाठी एसटीचा प्रवास खर्चिक नसला, तरी प्रवासी संख्या वाढल्याने दोन जणांना एका सीटवर बसवतात. त्यामुळे संसर्गाची भीती वाढली आहे.
सकाळी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. पूर्वेला इंदिरा गांधी चौकात बसची वाट पाहत उभे राहावे लागते. बस अन्यत्र कुठे थांबत नाही. त्यामुळे ठाकुर्ली, चोळेगाव आदी ठिकाणच्या प्रवाशांना इंदिरा गांधी चौकातच यावे लागते. च्खासगी वाहनाने अंबरनाथ, बदलापूर येथे येण्याजाण्यासाठी दिवसाला ३०० रुपये खर्च येत असल्याचे प्रवासी म्हणाले. रेल्वे वाहतूक बंद असतानाच कॉलेज सुरू झाले, तर हजारो विद्यार्थी प्रवासाकरिता गर्दी करतील. च्अशावेळी हा प्रवास अधिक त्रासदायक होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. रेल्वे तातडीने सुरू करा आणि आमची या यातनादायक प्रवासातून सुटका करा, अशी मागणी येथील प्रवाशांनी केली.