पारंपरिक मंगळागौरीच्या खेळाला हवी योगासनांची जोड

By Admin | Published: July 7, 2017 06:07 AM2017-07-07T06:07:08+5:302017-07-07T06:07:08+5:30

मंगळागौरीचे खेळ उत्तमरीत्या सादर व्हावेत, यासाठी महिलांनी त्याला योगसाधनेची जोड द्यायला हवी. स्टॅमिना वाढण्यासाठी

The game of traditional Mangalagauri game requires a combination of yogasanas | पारंपरिक मंगळागौरीच्या खेळाला हवी योगासनांची जोड

पारंपरिक मंगळागौरीच्या खेळाला हवी योगासनांची जोड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मंगळागौरीचे खेळ उत्तमरीत्या सादर व्हावेत, यासाठी महिलांनी त्याला योगसाधनेची जोड द्यायला हवी. स्टॅमिना वाढण्यासाठी त्याची मदत होते. महिलांना योगासने करायला जमत नसेल, तर किमान सूर्यनमस्कार दररोज घालावेत. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. मेडिटेशन, ओंकार उच्चारण केल्यास किंवा केवळ शांत बसल्यास कार्यक्रमापूर्वी येणारा तणाव कमी होऊ शकतो, असे मत योगप्रशिक्षक रेवती भागवत यांनी व्यक्त केले.
‘संस्कारभारती, डोंबिवली’तर्फे ‘नाच गं घुमा’ ही कार्यशाळा नुकतीच पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाली. मंगळागौर खेळताना येणाऱ्या अडचणी, त्या दूर कशा कराव्यात, निवेदन कसे असावे, सादरीकरण कसे असावे, श्वासावर नियंत्रण कसे ठेवावे, हालचाली कशा असाव्यात, याविषयी माहिती त्यात देण्यात आली. या वेळी भागवत बोलत होत्या. या कार्यशाळेत आरती मुनिश्वर, मंगला जोगळेकर, रोहिणी पेंढरकर, शिल्पा कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. त्यांच्याशी दीपाली काळे यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मंगळागौरी खेळांची गाणी सादर करण्यात आली. त्यावर महिलांनी फेर धरला.
भागवत म्हणाल्या की, मंगळागौर खेळायला येणाऱ्या प्रत्येक महिलेचा स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या स्वभावातील चांगुलपणा आपण घेतो. त्यातून एक टीम तयार करतो. एकमेकांना एकमेकांशी जोडतो. म्हणजेच योग साधत असतो. मंगळागौरीच्या खेळात दम टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. हे केवळ योगासनांमुळे साध्य होते. पिंगा घालताना श्वास कसा घ्यावा, याचे ज्ञान मिळते. योगासने आपण केवळ शारीरिक पातळीवर घेतो. नृत्य आणि योगासने किंवा क्रीडा आणि योगासने यांच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक पातळीवरचा योगा मंगळागौरीच्या खेळातून साधू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास या खेळातून सांध्यांचा व्यायाम होतो. शिवाय, या खेळामुळे आपण समाजाशी जोडले जातो, हे खूप महत्त्वाचे आहे. जनसंपर्क वाढतो. आपल्यातील अहंपणा बाजूला काढून ठेवणे म्हणजेच योग आहे, असे सांगितले.
पेंढरकर म्हणाल्या की, मंगळागौरीच्या कार्यक्रमापूर्वी सराव खूप महत्त्वाचा आहे. सरावातून स्टेजवर सादरीकरण करताना काय स्टॅमिना लागतो, त्याचा अंदाज येतो. तुम्ही झोकून देऊन तयारी करता, तेव्हाच खेळ चांगला होतो. स्पर्धेची तयारी करताना निवेदन व लेखनालाही तितके च महत्त्व आहे. अनेक स्पर्धांमध्ये थीम दिली जाते. मग, खेळताना त्यांचीसांगड घालावी लागते. स्पर्धेत उतरताना नखशिखान्त मॅचिंग लागते. कुठेच उणीव काढण्याची संधी परीक्षकांना मिळू नये, म्हणून प्रयत्न करावे लागतात. मंगळागौरीचे खेळ म्हणजे या शारीरिक नजाकती आहेत, असे सांगितले.
कुलकर्णी म्हणाल्या की, एखादी उत्तम नर्तिका चांगल्या प्रकारे मंगळागौरीचा खेळ खेळेलच, असे नाही. त्यासाठी सराव आवश्यक आहे. ज्या मुलींना खेळताना भीती वाटते, त्यांनी खेळाच्या आठ दिवस आधी नातेवाइकांसमोर सादरीकरण करावे. खेळातील जोडीदार चेअरअप करणारा असावा.
जोगळेकर म्हणाल्या की, ‘बेटी बचाव’ यासारखी सामाजिक प्रबोधन करणारी गाणी तयार केली आहेत. नवीन पिढीला उपयोगी पडतील, अशी ती गाणी आहेत. ही गाणी तयार करणे, हे योग्य आहे. काळानुरूप आपण बदलले पाहिजे. एखादी गोष्ट का करायची, त्यामागचे विज्ञान काय आहे, हे सगळे माहीत करून घ्यायचे आहे. ते माहीत करून घेतल्यास पुढच्या पिढीत संक्रमित होईल. सामाजिक प्रबोधन खेळातून करताना त्यांचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा मेळ घातला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मुनिश्वर म्हणाल्या की, निवेदनासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. मी ज्या गावात शिकले, तेथे दहावीनंतर शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे ग्रंथालय यासारख्या गोष्टी तर दूरच राहिल्या. पण, आता इंटरनेटसारखी साधने आली आहेत. त्यांचा वापर करून वाचन वाढवता येऊ शकते. निवेदनाचा स्त्रोत हा अभ्यास आहे. इतरांचे ऐकले तर आपणही चांगले बोलू शकतो. तसेच मनाचा मनाशी झालेला संवाद हेच उत्तम सूत्रसंचालन आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला भेटावे लागले तरी ते करता आले पाहिजे. निवेदकाला प्रसंगावधान राखणे महत्त्वाचे आहे. इतर कार्यक्रमांना जाऊन चिंतनही केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी या वेळी उपस्थित महिलांना दिला.

खेळ ठरले आकर्षण
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात लाट्या बाई लाट्या, नाच गं घुमा, फुगडीचे विविध प्रकार, कॅटवॉक झिम्मा, झिम्मा, राधेकृष्ण-गोपाळकृष्ण, पिंगा, गाठोडं, गोफ, झपोरी, दिंड, आगोटापागोटा, दहीवडा, काचकिरडा, आळुंकीसाळुंकी, कुलूपकिल्ली, हटुश रान बाई हटुश, लाट्या बाई लाट्या, होडी, गिरकी, ऊठबस फुगडी आदी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हे खेळ सर्वांचे आकर्षण ठरले.

खेळ ठरले आकर्षण
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात लाट्या बाई लाट्या, नाच गं घुमा, फुगडीचे विविध प्रकार, कॅटवॉक झिम्मा, झिम्मा, राधेकृष्ण-गोपाळकृष्ण, पिंगा, गाठोडं, गोफ, झपोरी, दिंड, आगोटापागोटा, दहीवडा, काचकिरडा, आळुंकीसाळुंकी, कुलूपकिल्ली, हटुश रान बाई हटुश, लाट्या बाई लाट्या, होडी, गिरकी, ऊठबस फुगडी आदी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हे खेळ सर्वांचे आकर्षण ठरले.

Web Title: The game of traditional Mangalagauri game requires a combination of yogasanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.