गणपत्ती बाप्पा एसटीला पावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:48+5:302021-08-12T04:44:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जवळजवळ दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळालादेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जवळजवळ दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळालादेखील बसला आहे; परंतु यंदा एसटीने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना सेवा देऊ केली आहे. त्यानुसार तिकीट आरक्षणालादेखील सुरुवात केली असून, कोकणात जाण्यासाठी भक्तांनी एसटीला पुन्हा एकदा पसंती दिली आहे. ठाण्यातून १९ जुलैपासून आतापर्यंत म्हणजे २० दिवसांत ४५० बसचे आरक्षण बुकिंग फुल्ल झाले असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणपतीला कोकणात जाणाऱ्या शेवटच्या चाकरमान्याला सुखरूप प्रवास करता येईल, तोपर्यंत गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कोकणात गणपतीला जाण्यासाठी यंदा ठाणे विभागामार्फत ८०० बसचे नियोजन केले आहे. ते करताना, तिकीट आरक्षणासाठी तिकीट खिडक्यायांबरोबर ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था केली आहे. गतवर्षी कोरोनाचे सावट असल्याने शेवटच्या काही दिवसांत बस सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यातच आरटीपीआर तपासणी करणे बंधनकारक केल्याने अवघ्या २१४ इतक्याच बस चाकरमान्यांसाठी धावल्या होत्या. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने दीड ते पावणेदोन महिन्यापूर्वी महामंडळाने बसचे नियोजन करताना आरक्षण सेवा ही उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ग्रुप बुकिंगला प्रामुख्याने प्राधान्य दिले आहे.
ठाणे नियंत्रण विभागांतर्गत यंदा ८०० (लालपरी) गाड्या कोकणात जाण्यासाठी सज्ज केल्या आहेत. त्यातील आतापर्यंत ४५० गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये १०५ ग्रुप, तर ३४५ बस तिकिटांद्वारे बुक झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित बसची बुकिंग फुल होईल, असा विश्वास व्यक्त करून जशी मागणी होईल, तसेच कोकणात गणपतीला जाण्यासाठी चाकरमान्यांना बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली आहे. अगदी शेवटच्या प्रवासीही बसने कसा कोकणात जाईल या दृष्टिकोनातून त्या सोडण्याचा ठाणे विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बोरिवली, ठाणे खोपट, कल्याण, विठ्ठलवाडी, मुलुंड आणि भांडूप या व आजूबाजूच्या परिसरात चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवात प्रामुख्याने चाकरमान्यांसाठी त्या आगारातून बस कोकणात सोडण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
दोन दिवस आधी ६०० बस सुटणार
गणेशोत्सवात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आदी चाकरमाने कोकणात आपल्या गावाकडे धाव घेतात. यामध्ये सिंधुदुर्गला पहिल्या बस निघतात. त्यानंतर रत्नागिरी आणि शेवटी रायगडला बस सोडल्या जातात. बाप्पा येण्याच्या दोन दिवस आदी नियोजित ८०० गाड्यांपैकी ६०० बस कोकणात निघतील, असे विभागाने सांगितले.
ऑनलाइन बुकिंगला पसंती
एसटी बसची बुकिंग करण्यासाठी यापूर्वी चाकरमाने सकाळपासून विविध एसटी डेपोच्या बाहेर रात्रीपासून रांग लावत होते; परंतु आता ऑनलाइन बुकिंगची सुरुवात झाली असल्याने त्याची पसंतीदेखील ऑनलाइन बुकिंगला दिसून आली आहे. त्यातही कोरोनाच्या सावटाखाली ऑनलाइन बुकिंगला अधिकची पसंती दिली जात असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या बुकिंगमुळे महामंडळाला त्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याची तयारी आतापासून सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.