भिवंडीतील अंजुरफाटा खारबाव चिंचोटी रस्त्यावरील गणरायाचा प्रवास खड्ड्यातून
By नितीन पंडित | Published: September 18, 2023 09:46 PM2023-09-18T21:46:48+5:302023-09-18T21:47:15+5:30
भर पावसात डांबरीकरणाने रस्ते दुरुस्ती
भिवंडी: तालुक्यातील अंजुरफाटा, खारबाव चिंचोटी या राज्य मार्गावरील गणपती बाप्पाचा प्रवास यंदा सुद्धा खड्ड्यातूनच होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने या रस्त्याची निगा दुरुस्ती राखणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भर पावसामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी डांबर मिश्रित खडी टाकून रस्ते दुरुस्ती करायला सुरुवात केली आहे.त्या मुळे नागरिक संतप्त झाले आहेत .
मानकोली,अंजुरफाटा,खारबाव, चिंचोटी हा राज्यमार्ग मागील कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असल्याकारणाने त्या विरोधात नेहमीच स्थानिक नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत आंदोलन केले आहे.परंतु एवढं होऊन सुद्धा या रस्त्याची निगा व दुरुस्ती राखून टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.आणि त्यामुळे अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
संताप जनक बाब म्हणजे पावसाळ्यात या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे पंधरा मे पर्यंत दुरुस्त करणारा असे लेखी आश्वासन सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भिवंडी तहसीलदार कार्यालयात स्थानिक ग्रामस्थांना दिले होते.परंतु ते न पाळता एन पावसाळ्यामध्ये पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये डांबरमिश्रित खडी टाकून रस्ते दुरुस्ती करायला घेतली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोबतच ठेकेदार कंपनीस पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात सोमवारी येथील स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.