गांधी पुलाच्या स्लॅबला तडे; भिवंडी पालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:30 AM2018-08-22T00:30:17+5:302018-08-22T00:30:43+5:30
पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत.
भिवंडी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत. पुलावरील सिमेंटच्या स्लॅबला तडे गेले असून खड्ड्यांमुळे उड्डाणपूल धोकादायक होत चालला आहे.
महापालिकेने रामेश्वर मंदिरापासून ते बागे फिरदोस मशिदीपर्यंत राजीव गांधी उड्डाणपुलाचे काम २००३ पासून सुरू होते. हे काम २००६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद््घाटन करण्यात आले. पुलासाठी पालिकेने १४ कोटी ९४ लाख ५५ हजार १२६ रुपये खर्चाची निविदा बनविली होती. मात्र, नंतर या निविदेची रक्कम सात कोटी रुपयांनी वाढवून २१ कोटी ९७ लाख ६२ हजार ६८ रुपयांचे काम जे. कुमार अॅण्ड कंपनीस देण्यात आले. तसेच या उड्डाणपुलाचा बांधकाम करार १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आला होता.
पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले पाइप स्वच्छ न केल्याने मागील काही वर्षांपासून पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यातून वेगाने वाहने गेल्यावर ते घाण पाणी पुलाखालून जाणाºया पादचारी किंवा दुचाकी चालकाच्या अंगावर पडते. दरवर्षी पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेकडून खर्च केला जातो. मात्र, खड्डे दुरुस्तीमुळे आता पुलावरील स्लॅबलाच तडे गेले असून, या बाबत पालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, ही दुरुस्ती करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
अवजड वाहनांना ये-जा करण्यासाठी महामार्ग व राज्यमार्ग असतानाही वाहतूक पोलीस पालिका क्षेत्रात जड व अवजड वाहनांना प्रवेश देतात. मागील आठवड्यात काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या धामणकरनाका ते नारपोली दरम्यान जाणारे जड वाहन खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली आहे. पालिका प्रशासन व कंत्राटदाराकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रंदिवस शहरात अवजड वाहने या पुलावरून जाण्यासाठी सोडत आहेत. त्यामुळे अंजूरफाटा ते नदीनाका दरम्यान असलेल्या तीन उड्डाणपुलांना धोका निर्माण झाला आहे.
वाहतूक थांबवा
शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी ताबडतोब बंद करावी. तशा प्रकारच्या सूचना पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी परिवर्तन मंचचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली आहे. भविष्यात उड्डाणपुलावर अपघात झाल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.