मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार" महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 14, 2023 02:32 PM2023-11-14T14:32:01+5:302023-11-14T14:32:23+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार मंगळवारी गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, यांच्या हस्ते, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, आ. संजय केळकर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते, नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, अभिनेते, निर्माते मंगेश देसाई, विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आदिनाथ कोठारे हे देखील विशेष उपस्थित होते. सुरुवातीला मराठी चित्रपट सृष्टीचा प्रवास गायन आणि नृत्याच्या माध्यमातून गंधारच्या कलाकारांनी सादर केला.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, रोख रक्कम (११ हजार १११ रूपये) देऊन कोठारे यांना गौरविण्यात आले. गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्षे होते.
मी बालनाट्य क्षेत्रात भव्यदिव्य कलाकृती निर्माण करणार आहे त्यासाठी गंधार या कला संस्थेला सोबत घेऊन काम करणार आहे असे प्रतिपादन कोठारे यांनी केले.