शिवसैनिकांची आयुक्तांपुढे गांधीगिरी; आंदोलनाला न्याय देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:13 PM2017-12-19T19:13:40+5:302017-12-19T19:13:59+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून पालिकेतील भ्रष्ट कारभार मोडीत काढा, या मागणीसाठी गेल्फ्या पाच दिवसांपासुन शिवसेना
भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून पालिकेतील भ्रष्ट कारभार मोडीत काढा, या मागणीसाठी गेल्फ्या पाच दिवसांपासुन शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी बेमुदत धरणे आंदोलना सुरु केले आहे. प्रसाशनाने नद्याप त्याची गांभीर्याने दाखल न घेतल्याने शिवसैनिकांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची गाडी अडवुन त्यांना घेराव घातला. तसेच ढिम्म प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलकांनी त्यांना फुले देत गांधीगिरी व्यक्त केली.
दरम्यान १७ डिसेंबरला उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ व सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांनी आंदोलकाची भेट घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर समाधान न झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. तरीदेखील प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने त्या अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक बैलांचे तर कार्यवाहीसाठी कुचकामी ठरत असलेल्या ढिम्म प्रशासनाचा निषेधार्थ प्रतिकात्मक कासवाचा पुतळा आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्यांच्या गळ्यात त्या-त्या विभागांच्या पाट्या लटकविण्यात आल्या. तद्नंतर आयुक्तांची गाडी पालिका मुख्यालयाबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडविली. यामुळे सुरुवातीला तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी झाली.
आंदोलकांनी आयुक्तांना गाडीबाहेर पडण्यास भाग पाडून त्यांना जाब विचारण्यासाठी घेराव घातला. त्यावेळी आंदोलकांनी आयुक्तांना फुले देत गांधीगिरी व्यक्त केली. आयुक्तांनी देखील आंदोलकांची भूमिका समजून घेत त्यांनी दिलेली फुले हसतमुखाने स्विकारली. यानंतर त्यांनी विरकर यांना चर्चेसाठी आपल्या दालनात आमंत्रित केले. त्यावेळी आयुक्तांनी विरकर यांच्या मागणी रास्त असल्याचे स्पष्ट करुन त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना दिले. तत्पुर्वी त्या अधिकाय््राांच्या अधिकारात पुर्वीप्रमाणेच कपात करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार होणार असल्याने विरकर यांनी आयुक्तांचे आश्वासन अमान्य करीत आंदोलन सुरुच ठेवले.