भिवंडीत माथाडीच्या ठेक्यावरुन गणेश कोकाटेची गोळी झाडून हत्या; कशेळी टोल नाक्याजवळील घटना
By जितेंद्र कालेकर | Published: December 7, 2022 10:05 PM2022-12-07T22:05:15+5:302022-12-07T22:06:47+5:30
नारपोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा
जितेंद्र कालेकर/नितिन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/भिवंडी: माथाडीच्या कामांचा ठेका मिळविण्याच्या स्पर्धेतून भिवंडीतील कशेळी टोल नाक्याजवळ गणेश दुर्योधन कोकाटे (३३) या गुंडाची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गणेश पूर्वी हा ठाण्यातील लोकमान्यनगर भागात वास्तव्याला होता. तो अलिकडेच भिवंडीतील कशेळी भागातील पवनपुत्र सोसायटीमध्ये वास्तव्याला गेला होता. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारीचे १३ ते १४ गुन्हे दाखल आहेत. बुधवारी तो त्याच्या मोटारकारमधून ठाण्यातून कशेळीकडे आपल्या घराकडे जात असतांना कशेळी टोल नाक्याजवळ आधीच दबा धरुन बसलेल्या काही गुंडांनी त्याच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.
यात भिवंडीतील कशेळी ग्रामपंचायत स्वागत कमानीजवळील मोटारीत असलेल्या गणेशच्या मानेवर एक गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळयात मोटारीतच निपचित पडला. त्यावेळी तिथे जमा झालेल्या काही लोकांनी त्याला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी भिवंडीचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. आरापीच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे उपायुक्त ढवळे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"