गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By नितीन पंडित | Published: August 20, 2022 01:34 AM2022-08-20T01:34:30+5:302022-08-20T01:34:41+5:30
केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते.
भिवंडी - सध्या राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे सरकार अस्तित्वात आले असून यापुढे सर्व सण उत्सव हे उत्साहात व जोमाने साजरे करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांना त्यांची अडचण लक्षात घेत, एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्यात येतील. यामुळे गणेशोत्सव मंडळांना सतरा ठिकाणी हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भिवंडीत जाहीर केले.
केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ७८ गोविंदा जखमी झाले असून सर्वांची परिस्थिती व्यवस्थित असून सर्व जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर भविष्यात कुठल्याही गोविंदाला व त्याच्या कुटुंबाला त्रास होणार नाही, यासाठी शासनाने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला असून जखमी गोविंदांसाठी विमा कवच दिले आहे. त्यामुळे भविष्यात संस्कृती जतनाबरोबरच खेळातील उत्सव गोविंदा पथकांना साजरा करता येईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
तर दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली असून मुंबई सुरत गुवाहाटी असा प्रवास करत राज्यात सर्वसामान्यांचे सरकार अस्तित्वात आले असून हे सरकार सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम करेल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.