गणेश मुर्तिकार यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावा : गणेशोत्सव समितीने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 02:21 PM2020-07-13T14:21:50+5:302020-07-13T14:25:02+5:30

सोमवारी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने महापौर नरेश म्हस्के याना निवेदन दिले आहे.

Ganesh Murtikar should be included in essential services: Demand made by Ganeshotsav Committee | गणेश मुर्तिकार यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावा : गणेशोत्सव समितीने केली मागणी

गणेश मुर्तिकार यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावा : गणेशोत्सव समितीने केली मागणी

Next
ठळक मुद्दे गणेश मुर्तिकार यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावा गणेशोत्सव समितीने केली मागणीमहापौर नरेश म्हस्के याना दिले निवेदन

ठाणे : गणेश मुर्तिकार यांचा गणेशोत्सवाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावा व त्यांना विशेष पास देण्यात यावेत. तसेच, त्यांना लागणाऱ्या मंडपाच्या परवानग्या लवकरच देण्यात याव्यात अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. गणेशोत्सव साजरा करणारच पण साधेपणाने या मतावर समिती ठाम आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० गणेशोत्सवा बाबत दिलेल्या निर्देशानुसार ठाण्यातील या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी नियमावलीबाबत मार्गदर्शन करावी असेही समितीचे म्हणणे आहे. 

       ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना आपल्या मागण्यांचे सोमवारी निवेदन दिले. यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडपाची व महावितरणची मागील अनामत रक्कम यावर्षी देखील आपले भाड़े आकारून तशीच ग्राह्य धरण्यात यावी, विसर्जन घाटाबाबत मार्गदर्शन करावे, मंडपात तीन वेळा होणारे निर्जंतुकीकरण महानगरपालिकेतर्फे करण्यात यावे, पुढील वर्षी मंडपाची परवानगी देताना या वर्षीची परवानगी ग्राह्य न धरता ती सालाबात प्रमाणे देण्यात यावी या प्रमुख मागण्याही या निवेदनात केल्या आहेत. या वर्षीची कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता ठाण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी या आधीच हा उत्सव अत्यंत साधेपणाने व प्रशासनास संपूर्णपणे सहकार्य करून साजरा करायचे ठरविले आहे. आता उत्सवसाठी कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कठीण काळात सर्व मंडळांनी प्रशासनासोबत राहण्याची तयारी दाखविली आहे. मात्र हा उत्सव ठाण्यात कशा पद्धतीने साजरा करावा याचे मार्गदर्शन अद्याप मिळालेले नाही. याबाबत सूचनावली जाहीर करावी असेही समितीने म्हटले आहे. मुंबईच्याधर्तीवर तशी ऑनलाइन बैठक लावण्यात यावी जेणे करून प्रशासन व गणेश मंडळे यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला जाईल असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले.

---------------------------------------------------------------------

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केलेल्या मागणीचे पत्र मी ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहे आणि समितीच्या मागणीनुसार पुढील कार्यवाही करण्याचे त्यांना सूचित केले आहे.

- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे 

---------------------------------------------------------------------

ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांसाठी समितीने तयार केलेली सूचनावली :-

१. ठाण्यातील या वर्षीचे उत्सव हे अत्यंत साधेपणाने होतील.

२. आगमन मिरवणूक किंवा विसर्जन मिरवणूक काढली जाऊ नये.

३. बाप्पाचे आगमन किंवा विसर्जन करताना गरजे पुरतेच कार्यकर्ते असावेत.

४. गणेश मंडपात सोशल डिस्टैंसिंगचे पालन करत पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नसावेत.

५. मंडपात प्रवेश करताना सैनिटाइजर व थर्मामीटर ची व्यवस्था असणे बंधनकारक राहील.

६. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मास्क,ग्लोव्स सारखी सुरक्षित उपकरणें वापरने बंधनकारक राहील.

७. श्रीं च्या आरती वेळी देखील ५ ते ६ कार्यकर्त्यांनाच मंडपात मुभा राहील.

८. कोणतेही सत्कार समारंभ अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत.

९. दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी सर्वप्रथम मंडळांची असेल.

१०. गणेश मुर्ती सोबत कोणतेही रेकॉर्डिंग शो या वेळी असणार नाहीत.

११. मंडप दिवसातुन दोनदा निर्जंतुकीकरण करणे ही जबाबदारी प्रशासनासोबत मंडळांची देखील राहील.

१२. मंडपात विभागाजवळचे कोरोना वैद्यकीय हॉस्पिटल, ऐम्बुलेंस, डॉक्टर, पोलीस यांचे संपर्क क्रमांक बोर्ड असणे बंधनकारक राहील.

१३. कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी गणेश मुर्ती या कमीत कमी लोक निगा राखू शकतील अशी असावी.

१४. शक्यतो ध्वनिक्षेपकाचा वापर टाळावा.

१५. प्रशासन ,पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य होईल याची काळजी घ्यावी व सर्व नियम पाळावेत.

१६. उत्सव साधेपणाने पार पाड़ताना निधी उरत असेल तर हॉस्पिटल अथवा वैद्यकीय संस्था यांना ऐश्चिक मदत करावी.

१७. गणेशोत्सव काळात सोशियल डिस्टेन्स चे पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजन करून देशात असलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारी रक्तपेढ्यांना संपूर्ण सहकार्य करावे.

Web Title: Ganesh Murtikar should be included in essential services: Demand made by Ganeshotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.