नाईकांच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 10:54 AM2022-04-23T10:54:30+5:302022-04-23T10:55:21+5:30
नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नवी मुंबईतील एका महिलेने नाईकांविरुद्ध रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची तसेच बलात्काराची तक्रार दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे.
ठाणे : ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेेश नाईक यांच्यावर असलेल्या कथित बलात्कार प्रकरणाची सुनावणी शुक्रवारीही होऊ शकली नाही. त्यांना या प्रकरणात अंतरिम दिलासाही मिळालेला नाही. रिव्हॉल्व्हरने धमकाविणे आणि कथित बलात्कार या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २७ एप्रिल रोजी करण्याचे आदेश ठाण्याचे जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी शुक्रवारी दिले.
नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नवी मुंबईतील एका महिलेने नाईकांविरुद्ध रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची तसेच बलात्काराची तक्रार दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे. त्यातील रिव्हॉल्व्हरने धमकावल्याप्रकरणाची सुनावणी २७ एप्रिल रोजी तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचा जबाब जाणून घेतल्यानंतरच करणार असल्याचे न्या. गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यानंतर बलात्कारावरील आरोपाबाबतही अटकपूर्व जामिनाची सुनावणी शुक्रवारी होणार होती.
मात्र नाईक यांच्या वकिलाने धमकाविणे आणि कथित लैंगिक अत्याचार या दोन्ही प्रकरणांमधील जामीन अर्जावर एकत्रित २७ एप्रिल रोजीच सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. न्या. गुप्ता यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता दोन्ही प्रकरणांत २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. अद्याप अटकपूर्व जामीन किंवा अंतरिम जामीनही मिळालेला नसल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, मुलाला घेऊन अमेरिकेला निघून जावे, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित महिलेने शुक्रवारी पुन्हा ठाणे न्यायालयाबाहेर केला.
तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या?
गेल्या तीन वर्षांपासून माझ्यासह मुलाला नाईकांनी वाऱ्यावर सोडले. आता तक्रार मागे घेण्यासाठीही धमक्या येत असून, अमेरिकेत जाण्यासाठीही दबाव टाकला जात आहे. मात्र, देश सोडून जाणार नसून वेळप्रसंगी न्यायासाठी आपण मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडेही धाव घेणार असल्याचे पीडित महिलेने स्पष्ट केले.