गणेश नाईकांच्या भूमिकेने ठाणे जिल्ह्यात समीकरणे बदलली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 05:40 AM2019-08-02T05:40:20+5:302019-08-02T05:42:10+5:30
युतीत भाजपच्या ताकदीत आणखी वाढ : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजपला दिलासा, तर आघाडीला धडकी
नारायण जाधव
ठाणे : राज्याच्या सत्तासोपानाची पायरी चढण्यासाठी मुंबई, पुण्यानंतर सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १६ जागांवर शिवसेना-भाजपाने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवले आहे. यामुळे युतीत उत्साह असला, तरी जागावाटपाचे सूत्र कसे ठरते, यावरच विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे भवितव्य ठरेल. या वातावरणातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, माजी मंत्री गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. सध्या त्यांचे पुत्र संदीप यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
नवी मुंबईतील ४५ हून अधिक नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. यामुळे आणखी एक महापालिका भाजपाच्या ताब्यात येईल. नाईक यांच्या भाजप प्रवेशाने आघाडीत बिघाडीत झाली आहेच, शिवाय शिवसेनेला धडकी भरली आहे. कारण गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात सर्वदूर असून त्यांच्या येण्याने भाजपची ताकद वाढली आहे. आघाडीची सत्ता असताना ते राष्ट्रवादीचे ‘कुबेर’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांच्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्याला खिंडार पाडून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी मोदीलाटेत बेलापूरमधून विजयश्री खेचून आणली. शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यामुळे ऐरोलीतून नाईक यांचे पुत्र संदीप मात्र विजयी झाले होते. मात्र, अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतील या दोन्ही मतदारसंघांतून शिवसेनेच्या राजन विचारे यांना प्रत्येकी ४४ हजार मतांची आघाडी मिळाली. नाईक पितापुत्रच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार मानले जात असताना त्यांनी अचानक भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राष्ट्रवादीला उमेदवार शोधणे कठीण जाणार आहे. ऐरोली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असला तरी आता संदीप यांच्या भाजप प्रवेशाने नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघाचे राजकारण पुरते बदलेल. शिवसेनेकडून सध्या मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये दाखल झालेले माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी आणि ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांची नावे चर्चेत आहेत. बेलापूरमधून भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे हेच नाव तूर्त असले, तरी गेल्यावेळी शिवसेनेकडून पराभूत झालेल्या विजय नाहटा यांनी काही महिन्यांपासून तेथे कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे.
जिल्ह्यात कळवा-मुंब्रा आणि शहापूरवगळता सर्वच मतदारसंघांत काँगे्रस-राष्ट्रवादीचा मागील विधानसभेत दारुण पराभव झाला. ठाणे शहरातील चारही मतदारसंघांत युतीने बाजी मारली. त्यात विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला असला, तरी शिवसेनेचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेकडून विजयश्री खेचून आणली होती. यावेळी शिवसेनेने पुन्हा या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला असून येथून ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के इच्छुक आहेत. जागावाटपात येथे ‘पालघर पॅटर्न’ राबवून कमळ चिन्हावर म्हस्केंना उभे करणार असल्याची चर्चा आहे. कोपरी-पाचपाखाडीत सध्या एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवड्यातून आमदार प्रताप सरनाईक यांची उमेदवारी कायम मानली जाते. तर भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव चर्चेत आहे. कळवा-मुंब्रा या मुस्लिमबहुल मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचा प्रभाव कायम आहे. लोकसभा निवडणुकीतही येथून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नऊ हजार ८८१ मतांनी पिछाडीवर होते. मात्र, नाईक यांचा भाजप प्रवेशाने आव्हाडांचे टेन्शन वाढले आहे. कारण येथील साधारण चार नगरसेवक त्यांचे समर्थक आहेत.
डोंबिवली या संघाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून विद्यमान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी आघाडीकडून कोण दोन हात करणार, हा प्रश्न आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत तेथून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ९३ हजारांची आघाडी मिळाली आहे. कल्याण-डोेंबिवलीत काँगे्रस-राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्वच नाही. जे स्वत:ला अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणवतात, ते जिल्हा परिषद निवडणुकीत मुरबाड या आपल्या होमपीचमधून पत्नीला निवडून आणू शकलेले नाहीत. याच नेत्याने आपल्या समर्थकासाठी अंबरनाथमधून उमदेवारी मागितली आहे. त्यामुळे डोंबिवलीत आघाडीने मनसेला बळ द्यावे, अशी चाचपणी सुरू आहे. कल्याण पूर्वमधून भाजपचे सहयोगी सदस्य गणपत गायकवाड हे यावेळी अपक्षच लढतात की कमळ चिन्हावर, हे गुलदस्त्यात आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघ हा भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोेडत असून भाजपच्या वाट्याला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यावर पुत्रप्रेमामुळे जिल्हा नेतृत्व नाराज आहे. पण त्यांना अचानक मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते किंवा कसे, याचीच सध्या चर्चा आहे. येथील मनसेचे माजी आमदार रमेश पाटील यांनी सध्या काँगे्रसचा हात पकडला आहे. उल्हासनगरमधून राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यावेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतात, यावर त्यांचे भवितव्य अवंबलून आहे. मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे यांच्यासमोर कोण उभे राहणार? यावर सारे गणित अवलंबून राहणार आहे. येथे जिल्हा परिषदेत पदाधिकारी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला फोडण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू आहेत.
अंबरनाथमध्ये युतीला लोकसभेत ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. दीर्घकाळ तेथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. शहापूरमध्ये राष्ट्रवादीसमोर युतीने मोठे आव्हान उभे केले आहे. मागीलवेळी राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेच्या दौलत दरोडा यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, लोकसभेत कपिल पाटील यांना येथे १५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता बरोरा यांनाच शिवसेनेने आपल्या तंबूत खेचले आहे. या मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला असून शिवसेनेच्या दौलत दरोडा यांना बळ देण्याचे हालचाली सुरू केल्या आहेत. आपला आमदार शिवसेनेने पळविला म्हणून पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात त्यांच्या चुलत भावाला उभे करण्याची रणनिती राष्ट्रवादीने आखली असून अजित पवार त्यासाठी मैदानात उतरले आहेत. बरोरा यांना शिवसेनेत घेतल्यामुळे नाराज झालेल्या मंजूषा जाधव यांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन्न बंडाचे निशाण फडकावले आहे.
भिवंडी शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी येथील सर्व आमदार युतीचे निवडून आले. मात्र, नंतर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४४ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. यामुळे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम मतदारसंघांत शिवसेना-भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. परंतु, भिवंडी ग्रामीणमध्ये मात्र विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्यासाठी धोक्याची घंटा घणघणते आहे. लोकसभेत येथून काँगे्रस उमेदवार सुरेश टावरे यांना ६२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले.
सध्याचे पक्षीय बलाबल
१८
शिवसेना-६, भाजप-७, राष्ट्रवादी-४, अपक्ष-१
२०१४ मधील सर्वात मोठा विजय
पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना - मते १,००,३१६, फरक - ५१,८६९, सर्वात कमी मताधिक्याने पराभव. कल्याण पूर्व - गोपाळ लांडगे ७४५, विजयी उमेदवार गणपत गायकवाड भाजप पुरस्कृत अपक्ष