गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग कला केंद्रात बाप्पाचं झाड
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 30, 2022 02:56 PM2022-08-30T14:56:35+5:302022-08-30T14:57:34+5:30
गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग कला केंद्रात बाप्पाचं झाड पाहायला मिळत आहे.
ठाणे :
गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग कला केंद्रात बाप्पाचं झाड पाहायला मिळत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश देत विविध फुलांची व इतर कलमं सभोवताली मांडून दिव्यांग मुलांनी आकर्षक अशी आरास केली आहे.
दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांच्या संकल्पनेतून गेली पाच वर्षे विशेष मुलांसाठी विशेष गणेशोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती केली जाते. मंगळवारी या बाप्पाचे आगमन दिव्यांग कला केंद्रात झाले असून विशेष म्हणजे याही वर्षी बाप्पाची मूर्ती लाल मातीची असून त्यात तुळशीच्या बियांचं समावेश आहे. यंदाही बाप्पाचं झाड या दिव्यांग कला केंद्रात भाविकांना पाहायला मिळत आहे. या मूर्तीचे विसर्जन शेजारी असलेल्या उद्यानात एका मोठ्या कुंडीत करून त्याची माती अकरा विविध छोट्या कुंडीत लावून त्यात काही दिवसात तुळशीचे रोप उगवते त्याला बाप्पाचं झाड संबोधले जाते असे नाकती यांनी सांगितले.
या गणेशोत्सवात दिव्यांग कला केंद्रातील विजय जोशी, अन्मय मेत्री,गौरव राणे, संकेत भोसले, पार्थ खडकबान्, आरती गोडबोले, रेश्मा जेठरा यांनी सहभाग घेतला आहे. संचालिका संध्या नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली परेश दळवी, माधुरी चव्हाण व इतर सहकारी यांनी उत्सवाची तयारी विशेष मुलांकडून करून घेतली असून आज त्यांचे पालक व इतर सर्वच संस्थेचे सभासद उपस्थित होते.