मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव
By धीरज परब | Published: August 25, 2022 08:38 PM2022-08-25T20:38:58+5:302022-08-25T20:39:07+5:30
गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या केवळ ३ इतकीच ठेवली असून २४ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली जाणार आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या केवळ ३ इतकीच ठेवली असून २४ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली जाणार आहेत. तर शहरातील नैसर्गिक खाड्या , समुद्र व तलाव , नदी अश्या २० ठिकाणी विसर्जन व्यवस्था केली जाणार आहे.
मीरा भाईंदर महापालिका व लोकप्रतिनिधी यांच्या कडून पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्या बाबत न्यायालय व शासन आदेशांसह कायद्यांचे काटेकोर पालन केले जात नसल्या बाबत जागरूक नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे . शहरात कृत्रिम तलावांची संख्या विसर्जनासाठी वाढवणे आवश्यक असताना महापालिकेने मात्र नाममात्र ३ ठिकाणीच कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे . भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान , मीरारोडच्या शिवार उद्यान व पूनम सागर वसाहत येथील जॉगर्स पार्क मध्ये यंदा कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत .
कोरोना संसर्ग काळात मूर्ती स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आली होती ती संकल्पना कायम ठेवत यंदा देखील २४ मूर्ती स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत . त्यामुळे नागरिकांना पालिकेच्या सदर केंद्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी देता येणार आहे . जेणे करून मुख्य रस्त्यांवरील कोंडी सुद्धा टाळता येणार आहे. पालिकेने शहरातील नैसर्गिक तलाव , खाड्या , समुद्र व नदी अश्या २० ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे . विसर्जन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा व व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्याचे उपयुक्त मारुती गायकवाड यांनी सांगितले .