मूर्तींची उंची आणि मिरवणुकीवरून गणेशोत्सव मंडळे नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:34+5:302021-07-15T04:27:34+5:30

ठाणे : राज्य शासनाने कोरोना काळात गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षी जाहीर केलेली नियमावली यावर्षीदेखील लागू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला ...

Ganeshotsav circles are upset over the height of the idols and the procession | मूर्तींची उंची आणि मिरवणुकीवरून गणेशोत्सव मंडळे नाराज

मूर्तींची उंची आणि मिरवणुकीवरून गणेशोत्सव मंडळे नाराज

Next

ठाणे : राज्य शासनाने कोरोना काळात गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षी जाहीर केलेली नियमावली यावर्षीदेखील लागू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मंडळांना बुधवारी बैठक घेऊन माहिती देऊन मंडळांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यात गणेश मूर्तीच्या उंची तसेच विसर्जन मिरवणुकीत किती लोकांचा सहभाग असावा, या दोन मुद्द्यांवर गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली.

ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाण्यात जवळपास २५०हून जास्त गणपती मंडळे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने यापूर्वीच केली आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये यंदाही श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांपर्यत असणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडपांसाठी लागणाऱ्या महापालिका, अग्निशामक दल, महावितरण, पोलीस व वाहतूक विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या या विनाविलंब मिळतील, या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या गणेश मंडळांची अनामत रक्कम महापालिकेकडे जमा आहे, ती यंदाही ग्राह्य धरावी, याबाबतच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागांना दिल्या.

गणेश मंडळांनी मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देऊन कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. तसेच विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ लागेल. यादृष्टीने मंडळांनी नियोजन करावे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन वेळेत होईल, या दृष्टीने महाघाटावर पोहोचता येईल, या दृष्टीने नियोजन करावे, अशाही सूचना या बैठकीत केल्या.

कार्यकर्त्यांना लस देण्यावरून गोंधळ

या बैठकीमध्ये मंडळातील कार्यकर्त्यांना लस देण्यासंदर्भात गणेश मंडळे आणि पालिका प्रशासनामध्ये मतभेद दिसून आले. ज्या पद्धतीने विविध ठिकाणी कॅम्प लावून नागरिकांना लसीचे डोस दिले. त्याच धर्तीवर मंडळातील कार्यकर्त्यांसाठी असे उपक्रम राबवावेत, अशी मागणी मंडळांनी केली. मात्र, अशा प्रकारचे कॅम्प लावण्यासाठी नियमावली असल्याचे कारण सांगून महापालिकेने ती फेटाळली.

.....

"स्थानिक पातळीवर ज्या सुविधा आणि परवानग्या द्यायच्या आहेत, त्या पातळीवर आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, मूर्तींची उंची आणि मिरवणुसंदर्भात ठाणे महापालिका निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार असल्याने आम्ही शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहोत. त्यानंतरच मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील गणेश मंडळांशी बोलून पुढची भूमिका घेण्यात येईल".

- समीर सावंत, अध्यक्ष समन्वय समिती, ठाणे

.............

राज्य शासनाने जे नियम उत्सवासाठी घालून दिले आहेत, त्यांची अंमलबजावणी ठाणे महापालिका करीत असून, तशा प्रकारच्या सूचना गणेश मंडळांना केल्या आहेत. शासनाने अद्याप नवीन नियमावली जाहीर केलेली नाही. स्थानिक पातळीवर सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. - संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठा.म.पा.

Web Title: Ganeshotsav circles are upset over the height of the idols and the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.