कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने; विसर्जनाच्या दिवशी यंदा ध्वनिप्रदूषणात ३० डेसिबलची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:57 PM2020-08-28T23:57:50+5:302020-08-28T23:58:05+5:30
मिरवणुकांवरील बंधनामुळे टळला वाद्यांचा वापर
ठाणे : कोरोनामुळे नियमात अडकलेला गणेशोत्सव आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवांची कमी झालेली संख्या, मिरवणुकांवर आलेली बंधने, यामुळे गौरीगणपती विसर्जनाच्या दिवशी ठाण्यातील ध्वनिप्रदूषणामध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यावर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी ही ६० ते ७० डेसिबलच्या दरम्यान नोंदण्यात आली आहे. हेच प्रमाण गेल्या वर्षी ९० ते ९५ डेसिबलच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे यावर्षी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाद्यांचा वापर झालेला नाही.
कोरोनामुळे यंदा२०० पेक्षा अधिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे ठाणे महापालिकेनेही मंडळांनातसेच घरगुती गणपती बसवणाऱ्यांना नियम आखून दिले. यामध्ये श्रीगणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे, यावेळी के वळ तीन लोक असावेत. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नये. दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात. घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करावे, अशा सूचनांचा समावेश होता. मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्याने यावर्षी विसर्जन मिरवणुकाही साध्या पद्धतीनेच निघाल्याने ध्वनिप्रदूषणात घट झाली.
गेल्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी ढोलताशे, डीजे, बॅण्जो अशा वाद्यांचा वापर केल्याने ठाण्यातील महत्त्वाच्या निवडक ठिकाणी दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. यामध्ये सर्वच ठिकाणी ही पातळी ९५ डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते. यावर्षी मात्र ही पातळी ७० डेसिबलपेक्षा अधिक नसल्याची माहिती बेडेकर यांनी दिली.
बाराबंगला परिसरात मात्र ध्वनिप्रदूषण : यंदा सर्वच ठिकाणी ध्वनिप्रदूषण कमी झाले असले तरी, शांतता क्षेत्रात मोडणाºया बाराबंगला परिसरात मात्र इतर परिसरांच्या तुलनेत जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. इतर ठिकाणी ६५ ते ७० डेसिबल असताना कोपरी पूल, बाराबंगला येथे मात्र विसर्जनाच्या दिवशी ९० डेसिबलपर्यंत त्याची नोंद झाली आहे. या परिसरात छोट्या प्रमाणात मिरवणुका निघाल्या. तसेच फटाकेही वाजवण्यात आले होते.