दंड न भरताच होणार गणेशोत्सव

By admin | Published: August 17, 2016 02:28 AM2016-08-17T02:28:13+5:302016-08-17T02:28:13+5:30

ठाणे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील ४५० गणेशोत्सव मंडळांना पालिकेने एक लाखाच्या दंड भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या.

Ganeshotsav will be done without paying the penalty | दंड न भरताच होणार गणेशोत्सव

दंड न भरताच होणार गणेशोत्सव

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील ४५० गणेशोत्सव मंडळांना पालिकेने एक लाखाच्या दंड भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. परंतु, या विरोधात राष्टवादीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात एक पाऊल मागे घेऊन पालिकेने त्या मागे घेतल्या आहेत. यामुळे आता दंड भरण्याचे विघ्न मंडळाच्या मानगुटीवरुन हटले असले तरी यापुढे जे नियमांची पायमल्ली करतील, त्यांच्यावर नियमानुसार दंड आकारला जाईल, असा इशारा मात्र दिला आहे.
तसेच ज्या मंडळांना गणेशोत्सव साजरा करायचा असेल त्यांनी रितसर अर्ज करुन परवानगी घेऊनच मंडप उभारणीला सुरवात करावी असेही आवाहन पालिकेने केले आहे. परंतु, पालिकेची परवानगी घेण्याआधीच शहरातील अनेक भागात गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे काही नामांकीत मंडळांनी तर रस्त्यावर खड्डे खोदून मंडप उभारणीला सुरवात केल्याने पालिका आता या मंडळांच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
ठामपाने शहरातील ४५० हुन अधिक मंडळांवर रस्त्यात गणेशोत्सव साजरा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची सुरवात करुन दंडाची ही रक्कम न भरल्यास मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसाही बजावल्या होत्या. या संदर्भात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेऊन दंड भरणार नसल्याचे सांगून वेळ पडल्यास रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करु असा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात पालिकेने आता या नोटीसा मागे घेण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव काळात विना परवाना मंडप बांधणे, रस्त्यावर खड्डा खोदणे तसेच परवानगीतील अटी आणि शर्थींचा भंग करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी आकारण्यात आलेल्या दंडाची वसुली करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, यावर्षी विना परवाना मंडप बांधणे, रस्त्यांवर खड्डे मारणे तसेच परवानगीतील अटी व शर्थींचा भंग केल्यास संबंधित मंडळांवर दंडात्मक कारवाई होईल.

Web Title: Ganeshotsav will be done without paying the penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.