बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक ; कारने येऊन मोबाईल चोरून पळायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:50 IST2025-02-08T09:50:14+5:302025-02-08T09:50:27+5:30
सदर चोरटे हे बस प्रवाशांचे मोबाईल चोरण्यासाठी कार भाड्याने घेऊन येत होते .

बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक ; कारने येऊन मोबाईल चोरून पळायचे
लोकमत न्यूज नेटवर्क, धीरज देशमुख / मीरारोड - मीरारोड भागात गर्दीच्या वेळात बस मध्ये चढणाऱ्या प्रवाश्यांचे मोबाईल चोरणाऱ्या ६ जणांच्या टोळीला काशीमीरा पोलिसांनी अटक केली असून ६ गुन्हे उघडकीस आणत १२ मोबाईल व कार जप्त केली आहे .
मीरारोड व भाईंदर भागात बस ने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल बस मध्ये चढताना तसेच बस मध्ये चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे . ह्या बाबत मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत . तर बहुतांश वेळा चोरीच्या ऐवजी मोबाईल गहाळ झाल्याची नोंद पोलीस करत असल्याचे देखील समोर आले होते .
मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गर्दीच्या वेळात बस स्थानक भागात पोलिसांची गस्त , सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी उपाययोजना काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी चालवल्या आहेत . शिवाय गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक देखील चोरट्यांचा धुमाकूळ रोखण्या करता तैनात केले आहे .
महत्वाचे म्हणजे पोलिसांनी बस स्टॉपवर मोबाईल चोरांची छायाचित्रे असलेली पोस्टर लावली आहेत . आरोपी दिसल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करावा म्हणून पोलिसांचा संपर्क क्रमांक त्यात दिला आहे . बस चालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ती छायाचित्रे शेअर करून त्यांना पण सतर्क केले आहे .
त्यातच काशीमीरा पोलिसांचे पथक बस स्थानक परिसरात गस्त घालत असताना एका कार मध्ये ६ जणं संशयास्पदरित्या आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना घेरून तपासणी व चौकशी सुरु केली असता त्यांच्या कडे १२ मोबाईल सापडले . त्यातील एक मोबाईल हा चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सहा जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला .
अन्वर गफुर सय्यद, समीर बशीर अन्सारी ऊर्फ बचकाना, मोहम्मद अफजल मोहम्मद वजीर शेख, सलीम अब्दुल रहमान शेख, अफरोज अहमद शेख, मोहम्मद सुलतान अब्दुल कय्युम खान ऊर्फ लाला अशी अटक चोरट्यांची नावे असून ते सर्व मुंब्रा चे राहणारे आहेत .१२ मोबाईल व कार असा ३ लाख दिड हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे . आरोपीना ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे .
सदर चोरटे हे बस प्रवाश्यांचे मोबाईल चोरण्यासाठी कार भाड्याने घेऊन येत होते . प्रवाशी बस मध्ये चढताना त्याच्या पुढे व मागे एक चोरटा आणि मोबाईल चोरणारा एक असे फिल्डिंग लावत . मोबाईल चोरला कि पुढील बस स्टॉप वर उतरत . मोबाईल चोरताना कोणी बघितले तर चोरटा पळून जात व त्याचे अन्य दोघे साथीदार देखील मोबाईल चोर असे ओरडत त्याच्या मागे पळून जात . सदर टोळीने काशीमीरा पोलीस ठाण्यात ३ गुन्हे तर दहिसर पोलीस ठाण्यात २ व कासारवडवली पोलीस ठाण्यात १ गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे . वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक योगेश काळे करत आहेत.